बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला कमालीची गर्दी होत असते. पण या गर्दीच्या पलीकडचे दुःख त्यांनी एका कार्यक्रमात मांडले. तीन गाण्यांवर नाचण्यासाठी तीन लाख मोजले जातात आणि आम्ही इकडे टाळ वाजवून पैसेही मिळत नाहीत आणि संरक्षणही मिळत नाही, अशी कैफियत इंदुरीकर महाराजांनी मांडली.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तवलवाडी इथे एका महोत्सवात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. याठिकाणी त्यांनी नाव न घेता नर्तकी गौतमी पाटील हिच्यावर टिका केली. गौतमी पाटील हे नाव घेतले तरी कुठला ना कुठला वाद आठवतो. गेल्या काही दिवसांमध्ये तर सातत्याने वादग्रस्त घटना तिच्याबाबतीत घडत आहेत. कधी तिच्या कपडे बदलण्याच्या व्हिडियोमुळे, कधी तिच्या कार्यक्रमातील गोंधळामुळे तर कधी तिच्या अश्लील इशाऱ्यांमुळे.
गौतमी पाटील हे नाव प्रत्येकाच्या ओठी आहे. काही दिवसांपूर्वी तिने अश्लील इशाऱ्यांसाठी महाराष्ट्राची जाहीर माफीही मागितली होती. पण आणखी एका गोष्टीसाठी गौतमी पाटील चर्चेत असते ते म्हणजे तिच्या मानधनासाठी तिच्या एका कार्यक्रमाचं मानधन लाखो रुपयांमध्ये असतं. कार्यक्रमांना होणारी गर्दीही अफाट असते. त्यामुळे आयोजक तिच्यावर लाखो रुपये उधळायला तयार असतात. याच कारणाने कदाचित इंदुरीकर महाराजांनी संताप व्यक्त केला असावा.
काय म्हणाले महाराज?
‘आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला, असा आरोप होतो. मात्र तिकडे तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये मोजले जातात. तिच्या कार्यक्रमात मारामारी होते, तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षणही दिलं जात नाही,’ असं इंदुरीकर महाराज कार्यक्रमात म्हणाले. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Kirtankar Indurikar Maharaj Reaction on Dancer Gautami Patil Programs