छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वत:च्या आगळ्यावेगळ्या शैलीच्या कीर्तनाने महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज गोत्यात आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून इंदुरीकर महाराज वादग्रस्त विधानांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. कीर्तनादरम्यान ते काय बोलतील, याचा नेम राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला अनेक जण गर्दी करत असतात. काही जाणती मंडळी त्यांच्या कीर्तनाला पारंपरिक कीर्तन मानत नाही. काहींनी तर त्यांच्यावर खुलेआम टीकादेखील केली आहे. अशात आता महाराज गोत्यात आले आहे. ‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असे वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी एका कीर्तनात केले होते.
महाराजांच्या त्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला होता. मात्र, त्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान खंडपीठाने इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्या वक्तव्यावरून त्यांच्यावर बरीच टीकादेखील झाली होती.
कीर्तन सोडून शेती करणार
वादग्रस्त वक्तव्यांवर होणाऱ्या टीकेमुळे उद्विग्न होत इंदुरीकर महाराजांनी कीर्तन सोडून शेती करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या त्या घोषणेमुळे चाहते नाराज झाले होते.