पुणे – दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. या महोत्सवात यंदापासून अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. त्याची माहिती अध्यक्ष माधव चंद्रचूड, क्युरेटर डॉ. गुरुदास नूलकर आणि संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. हा महोत्सव प्रथमच ऑनलाइन पद्धतीने जगभरात प्रदर्शित होणार आहे. महोत्सवाच्या नवीन बोधचिन्हाचेही प्रकाशन निमंत्रक आरती किर्लोस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ वर्षांपूर्वी किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांनी सुरू केला. पर्यावरणाशी निगडित चित्रपट प्रसारित करण्याबरोबरच वन्यजीवन, ऊर्जा, हवा, पाणी आणि पर्यावरण यांच्या अनुषंगाने चालणारे विविध उपक्रम व चित्रपट यांना स्थान देणारा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा एकमेवाद्वितीय असा महोत्सव आहे.
हा महोत्सव म्हणजे निसर्गाला जाणून घेण्याचा आणि पर्यावरणाशी निगडित विविध प्रश्नांचा आणि पैलूंचा अभ्यास व विश्लेषण करण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. आपला अमूल्य निसर्गवारसा जतन करण्यासाठी, प्रभावी आणि अर्थपूर्ण संवाद व देवाणघेवाणीसाठी एक सामाईक व्यासपीठ उन्नत करण्याची संधी हा चित्रपट महोत्सव बहाल करतो. ७ राज्यातील ३० शहरांमधून आजतागायत २५० पेक्षा जास्त महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी ३ ते ७ जानेवारी २०२० मध्ये १४वा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. मात्र, कोरोना संकटामुळे तो झाला नाही. अखेर यंदाचा १५वा जागतिक आणि ऑनलाइन महोत्सव आयोजित केला जाणार आहे. यंदाच्या महोत्सवाचा विषय सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज असा आहे.
महोत्सवाची वैशिष्ट्ये
या वर्षीचा महोत्सव ४ दिवसांचा असेल : (१४ ते १७ डिसेंबर) दररोज ४.३० तासांचे प्रक्षेपण असेल.
रोजचे प्रक्षेपण सकाळी ११ ते दुपारी ३.३० (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
रोजचे पुनप्र्रक्षेपण सायंकाळी. ६ ते रात्री १०.३० (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
आपण खातो ते अन्न, भोवतालच्या निसर्गाचे आरोग्य आणि निरोगी समाज यांचं एकमेकांशी असलेलं नातं विज्ञानानं ओळखलं आहे. या वर्षीच्या ऑनलाइन महोत्सवात, उद्घाटन समारंभ, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, वसुंधरा सन्मान (५ जणांना), पॉडकास्ट, चर्चासत्रे, निसर्गसंवाद, चित्रपट, समारोप समारंभ आदींचे भरगच्च आयोजन आहे.