मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – असे म्हणतात की ज्या दिवशी किरीट सोमय्या एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यासाठी पत्रकार परिषद घेतात त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या नेत्यावर कारवाई होते. आता तर शिंदे गटानंतर राष्ट्रवादीचेही नेते भाजपसोबत सत्तेत आल्यामुळे सोमय्यांच्या आरोपांचे काय होणार ही चर्चा राज्यात रंगली आहे.
किरीट सोमय्या यांनी २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांना धारेवरच धरले होते. अनेक नेत्यांवर ईडीने छापे मारले. काहींवर कारवाई देखील झाली. काही दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांवरही धाडी टाकण्यात आल्या. त्यानंतर २०१९ मध्ये शिवसेनेने धोका दिल्यानंतर सोमय्यांचा मोर्चा अनील परब व इतर नेत्यांकडे वळला. ईडीने जोरदार कारवाईची मालिकाच राबवली. अगदी अलीकडचा विचार केला तर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि मीरज येथील मालमत्तांवर धाडी टाकून ईडीने राष्ट्रवादीला शॉक दिला होता. काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. नवाब मलिक तर तुरुंगातच आहेत. छगन भुजबळ काही वर्षे तुरुंगात राहून बाहेर पडले आहेत.
अनिल देशमुख यांनाही भाजपने तुरुंगाची हवा खायला दिली. या संपूर्ण पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी भाजपसोबत सत्तेत येण्याचा निर्णय घेणे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आश्चर्याचा धक्का आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यात काहीही आश्चर्य वाटण्यासारखे नाही, असे म्हणणे म्हणजे त्यांचाच खेळ असल्याचे संकेत देणे होय. परंतु, आता किरीट सोमय्यांनी जिवाच्या आकांताने ज्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन आरोप केले, त्यांच्यासोबतच ते सत्तेत आहेत.
सोमय्यांचा वापर झाला?
किरीट सोमय्या यांनी पुराव्यांचे कागद हलवत पत्रकार परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप केले. जवळपास सर्वच नेत्यांवर कारवाई झाली. किमान चौकशी तरी झालीच. त्याशिवाय अनेक नेत्यांना तुरुंगात पाठवले आणि काहींच्या मालमत्तांवर छापे मारले गेले. या सर्व उपक्रमात सोमय्यांच्या हाती काय आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यासोबतच किरीट सोमय्यांचा भाजपने वापर करून घेतला, असेही बोलले जात आहे.