मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओवरून बराच गदारोळ माजला आहे. काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणून त्यांना जेरीस आणणाऱ्या सोमय्या यांच्या व्हिडिओ क्लिपमुळे त्यांच्यावर टीका करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे. अशात विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी या व्हिडिओच्या प्रसारणाशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ दाखविताना ते ब्लर करून प्रसारित व्हायला हवेत, याकडे गोऱ्हेंनी लक्ष वेधले आहे.
ईडीचा ससेमिरा विरोधकांमागे लावणाऱ्यांमध्ये किरीट सोमय्या यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांनी अनेकांना सळो की पळो करून सोडले आहे. अशात त्यांची एक व्हिडिओ क्लिप वादात अडकली आहे. त्या निमित्ताने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. हा मुद्दा आज पावसाळी अधिवेशनादरम्यानही आला. या व्हिडिओप्रकरणी दस्तुरखुद्द सोमय्या यांनी चौकशी करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. फडणवीस यांनीही या मागणीला उचलून धरत चौकशी होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यास योग्य नसून ते ब्लर करून प्रसारित व्हायला हवेत, अशी भूमिका विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. ‘पोलिस तपास होईल त्यावेळी वाहिन्यांनी माहिती गोपनीय स्वरूपात द्यावी. जेणेकरून पीडित महिलेपर्यंत पोहोचणे शक्य होईल. तुम्ही पेनड्राइव्ह दिला, तो बघणे म्हणजे खूप कठीण परीक्षा आहे. पण, मी महिला पोलिस अधिकारी, महिला डॉक्टर यांना तो व्हिडिओ बघायला सांगून त्यांचे मत घेईन. हे तपासून त्यातून निघणार काय आहे, असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला आहे.
‘ती’ने सभागृहावर विश्वास ठेवावा
त्या महिलेची तक्रार आली पाहिजे. ती भगिनी कोणी ऐकत असेल, तर तिने सभागृहावर विश्वास ठेवावा. लोकांचा विश्वास आपल्यावर आहे. या विश्वासाचा घात होत असेल, तर त्यावर गृहमंत्र्यांनी जाहीर केलेली चौकशी महत्त्वाची आह, असेदेखील या प्रकरणावर बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या.