मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा यांच्या आक्षेपार्ह व्हि़डिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले आहे. याप्रकरणात सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे. त्यात व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळावी, अशी मागणी केली आहे. कोणत्याही महिलेवर आपण अत्याचार केला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर विरोधकांनी सोमय्यांच्या मुद्द्यावरून विधानपरिषद डोक्यावर घेतली आणि आरोपांची राळ उडवली.
ठाकरे गटाने याप्रकरणात नाशिकसह, येवला व इतर शहरात आंदोलन केले आहे. त्याचप्रमाणे राज्यात ठाण्यातून ठाकरे गटाच्या वतीने महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केले. तर अकलूजमध्ये युवासेनेने आंदोलन केले. पाथर्डीमध्ये महिला आंदोलकांनी जोडे मार आंदोलन केले. पालघरमध्ये ‘लोकांची काढतो ईडी आणि स्वतःची निघाली सीडी’ अशी घोषणाबाजी देत त्यांचे पोस्टर जाळण्यात आले. भिवंडीत आंदोलन केले आहे.
येवल्यात ठाकरे गटातर्फे किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारत उध्दव ठाकरे गटाच्या येवला तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी येवला तहसीलदार आबा महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्या आली आहे. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख संभाजी पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, झुंजारराव देशमुख, तालुका प्रमुख रतन बोरणारे, शहर प्रमुख संजय कासार उपस्थित होते.
या निवेदनात म्हंटले आहे की, भाजपचे जेष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा वादग्रस्त आक्षेपार्ह व्हिडीओ लोकशाही न्युज या मराठी वृत्तवाहिनीवर प्रसारीत झाला असून सोमय्या यांचे हे कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहे. त्यांच्या या कृत्याचा शिवसेना येवला तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन कडक कारवाई करावी.
यावेळी किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख मनोज मथुरे माजी जिल्हा परिषद सदस्य छगन आहेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बापूसाहेब गायकवाड, माजी प्रशासक चंद्रकांत शिंदे, युवा सेना तालुका प्रमुख अरुण शेलार, महिला आघाडी तालुका प्रमुख सुमित्रा बोटे, शहरप्रमुख दीपाली नागपुरे, शोभा जाधव, संजय सालमुठे, गणेश पेंढारी, अनंता आहेर, पुंडलिक पाचपुते, साहेबराव बोराडे, मनोज रंधे, रामनाथ ढोमसे, श्याम व्यापारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.