सोलापूर – भाजपचे नेते आणि सध्या विशेष चर्चेत असलेले किरीट सोमय्या यांनी आता संपूर्ण शरद पवार कुटुंबाला लक्ष्य केले आहे. त्यामुळेच त्यांनी आता थेट खुले आव्हान दिले आहे. सोमय्या हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सोमय्या म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भगिनी या जरंडेश्वर कारखान्यात भागीदार आहेत. यासंदर्भातील पुरावे मी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) देणार आहे, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी झालेल्या आयकर विभागाच्या धाडींबाबत शरद पवार यांनी सोमय्या यांच्यावर आरोप केले. यासंदर्भात सोमय्या म्हणाले की, पवार साहेबांनी हे स्पष्ट करावे की, इंडोकोम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कुणाची आहे. या कंपनीने अजित पवार यांना १०० कोटी रुपये का दिले, किती वर्षांपूर्वी दिले. अजित पवार यांच्या नावे असलेल्या विविध संपत्ती व बेनामी संपत्तीमध्ये त्यांच्या बहिणी आणि मेव्हण्यांची भागीदारी आहे. अजित पवार यांनी राज्यासह जनतेची फसवणूक केली आहे. हे शरद पवार यांना मान्य आहे का, असा प्रश्न सोमय्या यांनी विचारला आहे.
सोमय्या यांनी शरद पवार यांना खुले आव्हान दिले की, माझ्याकडे जे काही पुरावे आहे ते सर्व मी आयकर विभाग, ईडी, सहकार मंत्रालयाकडे देणार आहे. यातील एकही पुरावा किंवा कागद खोटा असेल तर ते शरद पवार यांच्यासह अजित पवार, पार्थ पवार, रोहितत पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी सिद्ध करुन दाखवावे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.