मुंबई – भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यासाठी आज मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसने आज कोल्हापूरकडे रवाना झाले. सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने अगोदरच आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांना अडवण्याचा प्रय़त्न केला गेला.
मुंबईत अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यानंतर सोमय्या यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शरद पवार यांचे आपल्या विरोधात हे कारस्थान असल्याचे सांगितले. कोणीही मला अडवू शकत नाही. कोल्हापूर जिल्हाधिका-यांनी मला कोल्हापूर येण्यास बंदी घातली आहे. मात्र मुंबईत इतर ठिकाणी जाण्याचे आदेश त्यांनी दिलेले नाहीत. पोलिसांनी मी कोल्हापूरला गेल्यास तेथे अटक करावी, मात्र मला मुंबईत अटक करु शकत नाही. आपल्या जीवाला धोका असल्याने आपण कोल्हापूरला जाऊ नका, असे पोलिसांनी सोमय्या यांनी सांगितले. मला कोणापासून धोका आहे हा प्रश्न मी त्यांना केल्याचे ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळयाचा आरोप केल्यानंतर सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार ते आज मुंबईहून कोल्हापूरला रवाना झाले. पण, त्याअगोदर आज त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.