नवी दिल्ली – देशाच्या अनेक भागात मोहरी, वनस्पती, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या किमती २०० रुपयांच्या वर गेल्या आहेत. किराणा मालाच्या इतर वस्तूंचेही दर वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना काळात एकीकडे रोजगार नाही अन् दुसरीकडे अन्नधान्यासह तेलाच्या किमती गगनाला भिडल्याने सामान्य नागरिक हैराण झाला आहे.
ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, तिरुचिरापल्लीमध्ये मोहरीच्या तेलाचे दर २२० रुपये प्रतिकिलो, अहमदाबादला ११५ रुपयांप्रमाणे विकले जात आहे. १३ सप्टेंबर म्हणजेच सोमवारी म्हैसूरमध्ये वनस्पती (पॅक) तेल २२४ रुपये प्रतिकिलो विक्री झाले. तर चादरचेला येथे सर्वात स्वस्त ७१ रुपयांप्रमाणे विक्री झाले. साहिबगंजमध्ये सोयाबिन तेल २०९ रुपये प्रतिकिलो सर्वाधिक महाग विक्री झाले. तर अहमदाबादमध्ये १०७ रुपये सर्वात स्वस्त विक्री झाले. अहमदाबादमध्ये सूर्यफूल तेलाच्या किमती १३० रुपये तर लोहरदगामध्ये २३१ रुपये विक्री झाले. दिमापूरमध्ये पामतेल सर्वात स्वस्त ८० रुपये किलो आहे. तर सर्वात महाग १८५ रुपये लखनऊमध्ये आहे.
सलग तिस-या महिन्यात किरकोळ बाजारातील दर कमी झाल्यानंतर आणि रिझर्व्ह बँकेचा समाधानकारक दराच्या कक्षेत स्थिर झाल्यानंतरही किराणा वस्तूंचे दर वाढले आहेत. सोमवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये किरकोळ बाजारातील दर किंचित घटून ५.३ टक्क्यांवर स्थिरावले. अन्नधान, भाज्या आणि खाद्यतेलाच्या किमती घसरल्यामुळे हे परिणाम दिसले. परंतु खाद्यतेलाच्या किमतीत यंदा वाढ झाली आहे.
चहा झाला कडू
महागाईच्या पातेल्यात चहासुद्धा चांगलाच लाल उकळला आहे. कुड्डालोरमध्ये सोमवारी खुला चहाचे दर ५९२ रुपये प्रतिकिलो होता. सहरसामध्ये खुला चहा १२८ रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. किमतींच्या फरकाबाबत संकेतस्थळावर काहीच सांगण्यात आले नाही. बंगळुरूमध्ये टोमॅटो ८ रुपये प्रतिकिलो आणि मायाबंदरमध्ये ७० रुपये प्रतिकिलो विक्री झाला. मायाबंदरमध्ये कांद्यानेसुद्धा डोळ्यातून पाणी काढले आहे. येथे कांदा ५० रुपये प्रतिकिलो म्हणजेच सर्वात महाग आहे. राजकोट, सागर आणि वारंगलमध्ये सर्वात स्वस्त १७ रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. कुड्डालोरमध्ये ५८ रुपये प्रतिकिलो तर १० रुपयांच्या दरानं बेरहामपूरमध्ये विक्री होत आहे.
डाळही महाग
तेलाच्या किमतींच्या पाठोपाठ आता डाळीच्या किमतीही वाढल्या आहेत. तृश्शूरमध्ये तुरीची डाळ १२९ रुपये प्रतिकिलो आहे.जगदलपूरमध्ये सर्वात स्वस्त ७४ रुपयामध्ये विक्री झाली. लखनऊमध्ये उडिद डाळ १४५ रुपये प्रतिकिलो आहे. तर रिवामध्ये ७३ रुपये आहे. मुंबईत मुगाची डाळ १२५ रुपये आहे, तर मोतिहारीमध्ये ७० रुपयांमध्ये मिळत आहे. कुपवाडामध्ये मसूर डाळ १२० रुपये किलो विक्री होत आहे.तर होशंगाबादमध्ये ६६ रुपये किलो आहे.