नवी दिल्ली – एकेकाळी रशियामध्ये भुकेने व्याकूळ झालेल्या कोट्यवधी जनतेने तेथील झार या हुकूमशहाकडे भाकरीसाठी मोर्चा काढला होता, तेव्हा भाकरी मिळत नसेल तर ब्रेड का असा हास्यास्पद आणि संतापजनक सल्ला तेथील राजवटीने दिला होता. याची आठवण येण्याचे कारण म्हणजे, सध्याची उत्तर कोरिया मधील स्थिती. कोरियाला अन्नधान्याच्या कमतरतेने प्रचंड ग्रासले आहे. त्यामुळेच हुकुमशहा किम जोंग यांनी देशवासियांना फतवा काढला आहे की, जनतेने कमी अन्न खावे.
एकीकडे प्राणघातक क्षेपणास्त्रे मिळवण्यात मग्न असलेला उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम-जोंग याचे देशांतर्गत स्थितीवर दुर्लक्ष झाले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, कोरियात धान्याची प्रचंड टंचाई आहे. त्यामुळेच देशवासियांनी चक्क २०२५ पर्यंत कमी अन्न खावे, असे फर्मानच जोंग यांनी काढले आहेत. देशातील वाढत्या अन्न संकटाची समस्या गुंतागुंतीची असून त्यासाठी किम जोंग यांनी अनेक कारणे दिली आहेत. किम म्हणाले की, पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे आणि कृषी क्षेत्रातील उद्दीष्ट पूर्ण न केल्यामुळे देशातील अन्न संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे देशातील अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.
त्यातच यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचेही नुकसान झाले. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या केंद्रीय लष्करी आयोगाने बैठक घेऊन परिस्थितीवर विचारमंथन केले. याआधी एप्रिलमध्येही किम जोंग यांनी जनतेला अडचणींपासून दिलासा देण्यासाठी पुन्हा ‘कठीण मार्च’ सुरू करण्यास सांगितले होते. दरम्यान यापुर्वी ९० च्या दशकात उत्तर कोरियामध्ये हा शब्दप्रयोग वापरण्यात आला होता, जेव्हा देश तीव्र दुष्काळाशी लढत होता. यामध्ये सुमारे ३० लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या नोंदी आहेत. त्यानंतर सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर उत्तर कोरियाला मदत मिळणे बंद झाले.
हुकूमशहाच्या टीमशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, किम याने हेही स्पष्ट केले आहे की, अन्न संकट २०२५ पर्यंत कायम राहणार आहे. उत्तर कोरिया आणि चीन यांच्यातील सीमापार व्यापार पुढील चार वर्षांत पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वाढत्या अन्नसंकटाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियावर उपासमारीची भीती संयुक्त राष्ट्रानेही व्यक्त केली आहे. विशेषतः गरीब नागरिकांच्या अडचणी खूप वाढल्या आहेत.
कोरियातील अन्न संकटाची प्रमुख ४ कारणे अशी…
१. साथीच्या रोगामुळे लॉकडाऊनसारख्या इतर कडक उपायांमुळे पुरवठा विस्कळीत झाला.
२. आंतरराष्ट्रीय निर्बंधांनी उत्तर कोरियाला उर्वरित जगापासून तोडले आहे.
३. गेल्या वर्षी आलेल्या चक्रीवादळाचा कृषी क्षेत्रावरही परिणाम झाला.
४. अर्थव्यवस्थेसाठी चीनवर जास्त अवलंबून राहणे