मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनाथ तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना तत्काळ उपचार मिळावे, तसेच रुग्णवाहिनीमधील तणावाचे वातावरण दूर व्हावे यासाठी महानगरपालिका आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ‘किलबिलाट रुग्णवाहिनी’ तयार करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, मंत्री श्री. लोढा, आमदार प्रवीण दरेकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल यांच्या उपस्थितीत ‘किलबिलाट रुग्णवाहिनी’चे आज सह्याद्री अतिथीगृह येथे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.
“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये ‘किलबिलाट रुग्णवाहिनी’ सेवा सुरू झाली होती. ही सेवा आता मुंबईत सुरू झाली आहे. लवकरच या सेवेचा राज्यभर विस्तार करण्यात येणार आहे”, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा यांनी दिली. रुग्णवाहिनीच्या सायरनचा धडकी भरवणारा आवाज, तणावाचे वातावरण याऐवजी बाळाच्या गोड आवाजाचा सायरन, आत रंगीबिरंगी चित्रे, मंद संगीताची सोबत असे आल्हाददायक वातावरण या ‘किलबिलाट रुग्णवाहिके’त असेल.
महिलेला बाळंतपणासाठी वा गर्भारपणाच्या काळात काही त्रास झाला तर रुग्णालयात पोहोचविण्यासाठी बाळ आजारी असल्यास रुग्णालयात नेण्यासाठी, या रुग्णवाहिनीचा उपयोग होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच रुग्णवाहिनी रुजू होतील. ही सेवा विनामूल्य असेल. मुंबईनंतर राज्याच्या अन्य भागातही ही सेवा सुरु करण्यात येणार आहे.