इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कितीही ओटीटी प्लॅटफॉर्म्स आले, मनोरंजनाची अन्य साधने निर्माण झाली तरी छोट्या पडद्याने त्याचे स्थान आजही घरोघरी टिकवलेले दिसते. म्हणूनच वेगवेगळ्या धाटणीचे, विषयांचे कार्यक्रम टीव्हीवर दिसत असतात. नुकताच सुरू झालेला असाच एक कार्यक्रम म्हणजे ‘खुपते तिथे गुप्ते’. सध्या या कार्यक्रमाचा तिसरा सीझन झी मराठी वाहिनीवर सुरू आहे. आणि सुरुवातीपासून तरी या कार्यक्रमात राजकीय नेत्यांच्या मुलाखती रंगताना दिसतायत. आणि सुरुवातीला उत्साहात कार्यक्रम बघणाऱ्या प्रेक्षकांनी आता मात्र यावर नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
काय आहे आक्षेप?
बहुचर्चित ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात लवकरच आणखी एक राजकीय मुलाखत होणार आहे. येत्या भागात यात उद्धव गटाचे खासदार संजय राऊत हजेरी लावणार आहेत. नेमकी हीच गोष्ट प्रेक्षकांना खटकली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात राज ठाकरे यांच्या मुलाखतीने झाली आणि त्यानंतर नारायण राणे यांची मुलाखत प्रेक्षकांनी पाहिली. या कार्यक्रमातून वेगळं काही चांगला बघायला मिळेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. पण इथेही राजकारणी लोक दिसत असल्याने प्रेक्षक नाराज आहेत. संजय राऊत यांच्या मुलाखतीच्या एपिसोडचा प्रोमो शेअर झाल्यानंतर या व्हिडिओखाली नेटकऱ्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
कार्यक्रमाचं नाव तरी बदला
वृत्तवाहिन्यांवर दररोजच नेत्यांच्या मुलाखती रोजच सुरू असतात. तर मनोरंजन करणाऱ्या एखाद्या वाहिनीवर सिनेसृष्टीतल्या कलाकारांच्या मुलाखती दाखवल्या जातात. तरीही या कार्यक्रमात पुन्हा राजकारणी नेते म्हणजे फारच झाले, असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरनं ‘गुप्ते तिथे राजकारणी’ असं नाव ठेवा, असा खोचक सल्ला दिला आहे. तर दुसऱ्या एका युझरने मराठी कलाकार संपलेत, राजकारणी लोकच आता कलाकार झालेत, असं म्हटलं आहे. तर आणखी एका युजरनं आगामी भागात कोणते नेते या शोमध्ये दिसू शकतात, हे देखील सांगितलं आहे. ‘नारायण राणे आल्यानंतर संजय राऊत येणार, हे माहितंच होतं. आता देवेंद्र फडणवीस, मग उद्धव ठाकरे, मग एकनाथ शिंदे,मग अजित पवार असा क्रम लागणार’, अशी कमेंट केली आहे.
कलाकारांच्याही मुलाखती होणार
‘खुपते तिथे गुप्ते’ या शोचे या सीझनमधल्या एपिसोडचं शूटिंग आधीच झाले आहे. या सीझनमध्ये अनेक कलाकारांच्याही मुलाखीत पाहायला मिळणार आहे.