नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गेल्या शनिवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भारतीय रेल्वेने अनेक कडक उपाययोजना राबवल्या आहेत. अयोध्या, वाराणसी, गाझियाबाद, नवी दिल्ली आणि आनंद विहार यासारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची सुरक्षा वाढविण्यासाठी विशेष निवारा क्षेत्र आणि अतिरिक्त आरपीएफ जवान तैनातीची व्यवस्था करण्यात आली आहे.
गाझियाबाद स्थानकावर एक निवारा क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. फलाटावर गाडी लागत असताना कोणीही दोरी (सुरक्षा क्षेत्र) ओलांडू नये म्हणून इतर सुरक्षा उपाययोजना देखील राबवण्यात आल्या आहेत. यासाठी, फलाटावर दोरीसह आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांनी ट्रेन पूर्णपणे थांबण्यापूर्वी तिच्या जवळ येऊ नये याची खातरजमा होईल.
महाकुंभमेळ्याच्या सांगता आठवड्यात प्रवाशांच्या वाहतुकीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय रेल्वे उत्तर रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वे आणि पूर्व मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर निवारा क्षेत्र स्थापन करून सज्ज झाली आहे.
प्रयागराज परिसरातील रेल्वे स्थानकांवर अशी निवारा क्षेत्रे आणि गर्दी व्यवस्थापन उपाययोजना आधीच लागू आहेत. छठ आणि दिवाळीसारख्या गर्दीच्या हंगामात प्रदान केलेल्या सुविधांप्रमाणेच, हे उपाय ट्रेनमध्ये चढताना प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर आहेत. प्रवास सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे आणि अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे असे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे. पुढील अद्ययावत माहितीसाठी, प्रवाशांना अधिकृत चॅनेलद्वारे माहिती मिळवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.