नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कुंभमेळ्यानिमित्त नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे होणार आहेत. ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करतानाच ती वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी, अशी सूचना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते, तर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा आयुक्त तथा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव करिश्मा नायर दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाल्या होत्या.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त अध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. याबरोबरच पर्यटन, आरोग्य, शैक्षणिक सुविधांच्या निर्मितीबरोबर कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षित करावे. महानगरपालिका आणि पोलिस दलाने वाहतुकीचे नियोजन करावे.