मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– खो-खो चा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांकडून ऐतिहासिक खेळ पहायला मिळाला. भारतीय संघाने नेपाळला हरवून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या विजयानंतर क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे खेळाडूंशी संवाद साधत अभिनंदन केले.
खो-खो साठी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांच्या निर्देशानुसार दहा कोटींचा निधी नुकताच दिला होता. हा निधी दिल्याबद्दल खेळाडूंनी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांचे आभार मानले. यावेळी मंत्री श्री. भरणे खेळाडूंना म्हणाले, निधी देणं ही आमची जबाबदारी आहे. पण या जनतेच्या पैशाचे खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाने चीज केले आहे. भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. खेळाडूंच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.
महाराष्ट्राची कन्या प्रियांका इंगळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. खो-खो वर्ल्डकपवर भारतीय संघाने नाव कोरले आहे. महिला व पुरुष संघाने नवी दिल्ली येथे अंतिम सामन्यात नेपाळचा मोठ्या फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यात वर्चस्व राखणाऱ्या दोन्ही संघाने अंतिम फेरीतही चमक दाखवली.