नवी दिल्ली – ऑनलाइन ई कॉमर्स कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कृल्प्त्या काढतात. आपल्या प्लॅटफॉर्मवर काहीतरी वेगळ्याच वस्तू किंवा सामान उपलब्ध करून देतात. गेल्या वर्षी जुन्या नाण्यांची चलती होती. अनेक ग्राहकांनी जुन्या नाण्यांची खरेदी आणि विक्री केली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, यावर्षी न्यूझीलंडच्या एका संकेतस्थळाने भारतात प्रसिद्ध असणारी खाटच विक्रीला काढली आहे. विशेष म्हणजे भारतात तयार होणा-या खाटेला लागणा-या खर्चापेक्षाही महाग किमतीत तिची विक्री होत आहे. या खाटेला चांगली किंमत मिळाली, तर संबंधित व्यक्ती मालामाल होणार आहे.
भारतातील लोक परदेशात मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले आहेत. इतकेच नव्हे, तर परदेशातील लोकांना भारतीय संस्कृती आणि त्याच्याशी संबंधित अनेक वस्तू आवडतात. ही गोष्ट लक्षात घेऊन अनेक परदेशी कंपन्यांनी भारतीय संस्कृती आणि भारतीयांच्या रोजच्या जगण्यातील अनेक वस्तूंना विंटेजच्या नावाखाली विक्री करून चांगलाच पैसा कमावला आहे. एनाबेल्स या न्यूझीलंडमधील प्रसिद्ध ब्रँडने पातळ दोरीने विणलेली लाकडाची भारतीय खाट विक्रीला काढली आहे. विशेष म्हणजे या खाटेला कंपनीने Vintage Indian Daybed असे मस्त नाव दिले आहे. खाटेची किंमत ८०० न्यूझीलंड डॉलर (४१ हजार रुपये) आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या महाग किमतीत खरेदी करावे, असे या खाटेत काहीच दिसत नाही. ती आपल्या खाटेसारखी सामान्य दिसत आहे. भारतात खाटेची किंमत खूपच कमी आहे. न्यूझीलंडमध्ये दहा पटीहून अधिक किमतीत तिची विक्री केली जात आहे.
कंपनीने खाटेचे फोटो अपलोड केले असून, ती साधारण खाटेप्रमाणेच दिसत आहे. भारतातील प्रत्येक गावा-शहरात खाटेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. ग्रामीण भागात खाटेचा जास्त वापर केला जातो. हेच कशाला, प्रत्येक ढाबा आणि हॉटेलमध्येही खाटेचा वापर केला जातो. भारतातील अनेक वस्तू परदेशात विक्री केल्याचे अनेक प्रकरणे आहेत. काही वस्तू विक्री केल्यावरून वादही निर्माण झाले होते.