मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा ही नवीन वर्षातील महाराष्ट्रातील सर्वांत दुर्दैवी घटना मानली जात आहे. या कार्यक्रमात ज्या १४ लोकांचा मृत्यू झाला त्यापैकी १२ जणांच्या पोस्टमार्टम अहवालात आणखीही काही गोष्टी आढळल्या आहेत.
खागघर येथे १६ एप्रिलला श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते. ३९ ते ४१ डिग्रीपर्यंत पारा गेला असताना हजारो लोक सकाळी आठपासून उघड्या मैदानात बसले होते. याचा उल्लेख स्वतः सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून केला होता.
तर एक दिवस आधी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनाही उन्हाचा त्रास झाला होता. परंतु, त्याबद्दल त्यांनी वरीष्ठांना सांगितलेच नाही. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आणि आता सर्व १४ जणांचे पोस्ट मार्टम रिपोर्ट आलेले आहे. यातील १२ जणांच्या अहवालात त्यांनी काहीही खाल्लेले नव्हते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकीकडे पोट पूर्णपणे रिकामे आणि दुसरीकडे कडाक्याच्या उन्हात कितीतरी तास बसून राहणे यामुळे उष्माघाताचा परिणाम लवकर झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. १४ रुग्णांमध्ये १० महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे.
यामुळे झाला मृत्यू
एकतर पोटात अन्नाचा कणही नाही आणि दुसरीकडे उन्हात बराच वेळ बसून राहणे हे तर मुख्य कारण आहेच. सोबत सर्व मृतांच्या पोटातील पाणी कमी झालं होतं आणि रक्तातील प्रोटीन्सवरही परिणाम झाला होता. यासोबतच मृतांपैकी काहींना इतरही गंभीर व्याधी होत्या, असे सांगितले जात आहे.
आता हीट अॅक्शन प्लान
आपल्या देशात घटना घडून गेल्यावर प्रशासन जागे होत असते. या प्रकरणातही तसेच झाले. घारघरच्या घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाने हीट अॅक्शन प्लान तयार करण्याची तयारी केली. त्यासाठी नागपुरातील व्हीएनआयटीला (विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था) जबाबदारी सोपविण्यात आली.
Kharghar Heat Stroke Death Case Postmortem Report