खंडोबाचे नवरात्र अर्थात चंपाषष्टी/स्कन्द षष्ठी
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष षष्टी असे सहा दिवस (यंदा 5 ते 9 डिसेंबर) खंडोबाचे नवरात्र असते. तर षष्ठीला चंपाषष्टी साजरी केली जाते. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट या जयघोषात व जल्लोषात महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या भगवान मल्हारी मार्तंड खंडोबा यांचा उत्सव जेजुरी गडासह संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटकात साजरा होतो.
मल्हारी मार्तंड खंडोबा हे भगवान शंकराचा अवतार आहेत. खंडोबाचे नवरात्र हा बोलीभाषेत शब्द जरी असला तरी हा उत्सव सहा दिवसात असल्यामुळे त्याला षडरात्रही म्हणतात. या नवरात्र काळात पहाटेपासून खंडोबा मंदिरात तळी आरती, बेल भंडारा उधळण, महाआरती, महानैवेद्य असा भरीव कार्यक्रम केला जातो. रात्री उशिरापर्यंत दिवट्या बुधल्याच्या साथीने भगवान मल्हारी मार्तंड यांच्या गोंधळ गीताचे जागर कार्यक्रम सर्वत्र सुरू असतात.
चंपाषष्टी
या दिवशी भगवान शिवशंकर यांनी मल्हारी मार्तंड अवतारात तमाम सृष्टीला त्राहिमाम् करून सोडणाऱ्या मणी आणि मल्ल या राक्षसांचा आपल्या सात कोटी सैन्यासह हल्ला करून नाश केला. तेव्हापासून येळकोट(सात कोटी) तर मल्ल हारी अर्थात मल्हारी हे नाव भक्तांच्या मनात कोरले गेले.
खंडोबाचा टाक
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा यांचा टाक प्रत्येक घरातील देव्हाऱ्यात नित्यनियमाने पुजला जातो. घरात नवीन केलेले टाक चंपाषष्ठीला देवाला भेटून आणतात.
खंडोबाचा नवस
लग्न तसेच तत्सम शुभम विधींचे नवस खंडोबा जवळ बोलले जातात. या नवसपूर्तीसाठी लाखो भाविक दरवर्षी चंपाषष्ठीला जेजुरी गडावर दर्शनासाठी जातात.
खंडोबाचा भंडारा
जसा विठोबाचा अबीर बुक्का, देवीचे कुंकू, ज्योतिबाचा गुलाल तसा खंडोबाचा भंडारा हे लेणं आहे. त्यामुळे चंपाषष्ठीला जेजुरी गडावर तसेच खंडोबा मंदिरात भंडाऱ्याची मुक्त उधळण हा जेजुरी गड सोन्याचा करते.
तळी आरती
खंडोबाच्या नवरात्रोत्सवात तसेच चंपाषष्ठीला घरोघरी सायंकाळी तळी आरती केली जाते. त्यानिमित्ताने येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट या नामघोषात भंडारा व खोबरे यांची उधळण केली जाते. तळी भंडार गीत खालीलप्रमाणे
खंडोबाचा नैवेद्य
संपूर्ण नवरात्र तसेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाला आरतीनंतर पुरणपोळी, रोडगे, वांग्याचे भरीत, कांदा पात याचा महानैवेद्य दाखवला जातो. या काळात खंडोबाचे वाहन श्वान व अश्व यांना अन्नदान करण्याचे विशेष महात्म्य आहे. अनेक भक्त गण हे सहा दिवस उपवास करतात. चंपाषष्ठीला उपवासाची सांगता करतात, तर काही भक्त या नवरात्र काळात अनवाणी राहतात. चंपाषष्ठीला महाराष्ट्रातील सर्वच खंडोबा देवस्थानच्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणाऱ्या जत्रा व कुस्त्यांचे फड यांची मोठी परंपरा आहे.