महेश शिरोरे, देवळा
तालुक्यातील खामखेडा येथे अक्षय तृतीयाच्या या साडेतीन मुहूर्तावर आई आशापुरी आनंदोत्सव सोहळा, माहेरवाशिणी स्नेहमिलन आणि शिरोरे परिवाराचे सस्नेह संमेलन संपन्न झाले. हा त्रिवेणी, त्रिसूत्री कार्यक्रम खूप दिमाखदार आणि आनंददायी वातावरणात पार पडल्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
ब्रम्ह वृंदाच्या साक्षीने सकाळी पहाटे पाच वाजेपासून ते साडे अकरा वाजेपर्यंत होम हवन विधी करण्यात आला. परिवारातील आलेल्या सर्व माहेरवाशिणी व जावाई, भाचे, शिरोरे परिवारातील सर्व सदस्य, खामखेडावासिय यांच्या उपस्थितीत आई आशापुरी मातेची भव्य दिव्य रथात अशी मिरवणूक काढण्यात आली.
संपूर्ण गावात रांगोळी काढून सर्व गाव सुशोभित करण्यात आले होते. सर्व माहेरवाशिणी व उपस्थितांनी देवीच्या गाण्याच्या तालावर तल्लीन होऊन मनमोहून नाचण्याचा आनंद लुटला. तर पूर्ण मिरवणुकीत जांभळी साडी असलेल्या माहेरवाशिणी फेटा बांधून तर सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. पुरुषांना सफेद ड्रेस कोड तर भाचींना लाल साडी, सासरवाशिणींना केशरी रंगाची साडी हा ड्रेस कोड असल्याने हे मिरवणूकीत ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सर्व एक सारखे दिसत असल्याने खूप नयनरम्य वाटत होते.
संपूर्ण खामखेडा नगरीतून ही मिरवणूक वाजत गाजत मंडपात आल्यानंतर प्रतिमा पूजन करून आई भगवतीची प्रतिमा यजमानांच्या हस्ते सनई चौघडा व पेशवाई ग्रुपच्या वाद्यावर स्थानापन्न करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मातेची विधिवत पूजा करून प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत गीत सार्थक शिरोरे, अर्थव शिरोरे, शुभ्रा कोठावदे या चिमुकल्या बाळगोपाळ यांनी आपल्या वाणीतून सादर केले. ५६ भोग महाआरती करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्याचे एक वैशिष्ट्ये म्हणजे ९५ वर्षाच्या माहेरवाशिणी मात्र हसत खेळत आनंदात खामखेडा नगरीत आपल्या जन्म भूमीत खुश दिसत होत्या. शिंदखेडा पाटण या आईच्या स्थानावरून पोस्टमन रुपी बैलगाडीवरती आई आशापुरीने पाठविलेले शिरोरे परिवाराला देण्यासाठी गोदमाईचे पत्र घेऊन आलेले दत्तात्रेय कोठावदे यांनी तर सर्व उपस्थितांचे मन मोहून टाकले. यावेळी या पत्राचे वाचन करण्यात येऊन ते पत्र या सोहळ्याचे आयोजक तथा पत्रकार महेश शिरोरे यांच्याकडे ओवी दत्ता कोठावदे यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच माहेरवाशिणी व जावई, भाचे, प्रमुख पाहुणे यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.
काही माहेरवाशिणींनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजचा जो सोहळा न भूतो, न भविष्यती असा नयरम्य सोहळा आमच्या सर्व माहेरवाशिणींच्या स्मरणात राहील. महाराष्ट्र राज्यातील माहेरवाशिणींचा हा दुसरा नयनरम्य सोहळा आणि या मंगलमय वातावरणात आम्ही आखाजीच्या मुहूर्तावर झोका खेळून आनंद लुटला. या कार्यक्रमासाठी माहेरवाशीणींकडून वर्गणी घेण्यात आली नाही.
योगिता शिरोरे, विलास शिरोरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मुली, भाची, आत्या या सर्व खामखेडा नगरीतील माहेरवाशिणी असून आता सर्वच खामखेडा येथील शिरोरे परिवार हा व्यवसाय, नोकरीनिमित्ताने आपापल्या सोयीनुसार राहायला गेलेत. खामखेडा गावात फक्त सात कुटुंब राहायला असल्याने त्यांच्या मनात आले की आपण आपल्या परिवारातील सर्व लेकींना खामखेडा नगरीत बोलून त्यांचे स्वागत करु. त्यानुसार महेश शिरोरे, रामचंद्र शिरोरे, योगिता शिरोरे , रमेश शिरोरे, पोपटराव शिरोरे, भगवान शिरोरे ,निखिल शिरोरे , अमोल शिरोरे, प्रकाश शिरोरे,निलेश शिरोरे,अतुल शिरोरे , स्वप्नील शिरोरे, तुषार शिरोरे , नंदकिशोर शिरोरे ,मीना शिरोरे यांनी अपार कष्ट घेतले.
प्रकाश शिरोरे यांच्या जागेवर कार्यक्रमाची रूपरेषा ठरविली. सर्व माहेरवाशिणी, भाच्या, भाचे, जावाई, नात नातू, प्रमुख पाहुणे सर्वांना आमंत्रित करण्याचे ठरवून आठ तारिख ठरविली. त्रिसूत्री संकल्पनेतून खामखेडा नगरी मंगलमय वातावरणात आनंददायी झाली. तर खान्देश किंग शिरपूर येथुन आलेल्या खान्देश किंग ग्रुप तर्फे आबा चौधरी , धीरज चौधरी या कलाकारांनी सर्वांची मने जिकून त्यांच्या गाण्यावर सर्व उपस्थित माहेरवाशिणी, जावाई व तरुणाई नाचण्यासाठी थिरकली. आलेल्या सर्वाना शिरोरे परिवाराकडून एक उत्कृष्ट अशी भेट वस्तू देण्यात आली. माहेरवशीणींसाठी जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे ओटी व खाऊ देखील देण्यात आला. तर खामखेडा वासियांचे भाचे बाबूलाल अमृतकार व सौ रेखावती अमृतकार यांच्याकडून उत्कृष्ट पर्स देण्यात आली.
सौ शोभाताई भास्कर दशपुते यांच्याकडून गळ्यातील ठुशी भेट म्हणून सर्वांना देण्यात आली. यावेळी भाग्यवान ६ महिला व ५ पुरुष या विजेत्यांची सोडत काढण्यात आली. त्यात महिलांमधून ज्योती शिवाजी शिरोरे या भाग्यवान माहेरवाशिणीला भरजरी पैठणी भेट म्हणून देण्यात आली. अर्चना राजेंद्र पाटकर, दिपाली तुषार ब्राम्हणकार , सुगंधा श्रावण शिरोरे, शोभाताई भास्कर दशपुते, हर्षदा नितीन पाचपुते, पुरुषांमधून डॉ धनंजय भास्कर दशपुते या भाग्यवान विजेत्यांना सोवळे देण्यात आले.
किरण भटू देशमुख, राजेंद्र एकनाथ पाटकर, डॉ के के कोठावदे, पंकज सुधाकर भोकरे, या भाग्यवान जावई व भाचे हे सोडतीचे मानकरी ठरले. जोगवा मागून शिरोरे परिवारातील सर्व सात कुटुंबाचे एकत्रीकरण करून आंनददायी वातावरणात सर्वांचे मिलन केले. या मिलन प्रसंगी सर्वांच्या डोळ्यातून आनंददायी अश्रू अनावर झालेत. सर्व माहेरवाशिणी मनमोकळेपणाने आनंदात सर्व कुटुंबाला बघितले. सर्व शिरोरे परिवाराने आलेल्या सर्व माहेरवाशिणींना सुखात आपापल्या सासरी जाण्यासाठी एकत्र झालेल्या माहेरवाशिणींना गेट पर्यत जाऊन शुभेच्छा दिल्यात.
या सोहळ्यासाठी पहाटे पाच पासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भव्य अशा आलिशान मंडपात गर्दी होती. या सोहळ्याचे सूत्रसंचलन सचिन दशपुते यांनी केले तर प्रास्ताविक महेश शिरोरे, आभार पोपटराव शिरोरे यांनी मानले. यावेळी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष डी येवला , उदय दादा वाणी नाशिक, अरविंद कोठावदे, सचिन दशपुते , दिगंबर घरटे, पंडित निकम, आण्णा पाटील व सर्व माहेरवाशिणी, भाच्या, जावाई आदींसह खामखेडा ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.