इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चित्रपट ‘खालिद का शिवाजी’ याचे प्रदर्शन माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांनी एक महिन्यासाठी स्थगित केले आहे. हे स्थगन महाराष्ट्र सरकारकडून चित्रपटातील ऐतिहासिक चुकीबाबत आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर होऊ शकणाऱ्या संभाव्य परिणामाबाबत व्यक्त केलेल्या चिंता लक्षात घेऊन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.
ते म्हणाले की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपट प्रमाणन अधिनियम, १९५२ च्या कलम ६(२) अंतर्गत या चित्रपटाचे प्रमाणपत्र एक महिन्यासाठी स्थगित केले आहे. महाराष्ट्र सरकारने चित्रपटामधील ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास आणि सांस्कृतिक भावना दुखावण्याबाबत शक्यता व्यक्त केली असून विशेषतः आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सव सणाच्या काळात समाजभावना दुखावल्या जाऊ नये या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, आशिष शेलार जी आपण ’खालिद का शिवाजी’ या चित्रपटाची प्रेस कॉन्फरन्समधे स्तुती केली व आपल्या विभागाने सर्व गोष्टी तपासून हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पाठवून या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म मिळवून दिला त्याबद्दल आपलं अभिनंदन!!
सांस्कृतिक विभागाचा मंत्री म्हणून आपलं काम चोख आहे, मात्र आता केवळ काही ठराविक संघटना याला विरोध करत आहेत म्हणून उद्या चित्रपट प्रदर्शित होत असताना सरकार आज दिग्दर्शकाला नोटीस पाठवतं, हे दुर्दैवी आहे.
यावरून मा. आशिष जी या सरकारमधीलच काही लोकांकडून आपल्याला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे का, असा प्रश्न पडतो. एखाद्या चित्रपटावर अनेकांचं भविष्य अवलंबून असतं, त्यामुळे आपण या दबावाला बळी न पडता या चित्रपटाच्या पाठीशी ठामपणे उभे रहाल व लवकरात लवकर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल, ही अपेक्षा!