इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांच्या व्हायरल क्लिपचा दाखल देत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एकनाथ खडसे यानी गंभीर आरोप केला आहे. महाजन यांचे एका महिला आयएस अधिका-यासोबत संबध असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. त्या महिला अधिका-याचे नाव देखील माहिती असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. गृहमंत्री अमित शाह यांना भेटून यासंदर्भात विचारणार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आरोपानंतर गिरीश महाजन यांनीसुध्दा या आरोपाला जोरदार उत्तर दिले आहे. मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडलं तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील. एक नंबरचे महाचोर आहेत. कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही असा पलटवार त्यांनी केला. आपल्यावर झालेल्या आरोपांवर एक तरी पुरावा दाखवावा, सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन असं आव्हानही त्यांनी दिले. मी जर एका गोष्टाचा खुलासा केला तर खडसे तोंड काळ करतील, घरातील गोष्ट आहे, पण, मी बोलणार नाही, मला बोलायला लावू नका अशा स्पष्ट शब्दात महाजन यांनी खडसेंना इशारा दिला.
जळगाव जिल्ह्यात खडसे – महाजन वाद नवा नाही. पण, या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केल्यामुळे त्यांची चर्चा आता रंगू लागली आहे. विशेष म्हणजे याअगोदर खडसे यांनी सीडी असल्याचे सांगत महाजन यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आता हा गंभीर आरोप केला आहे. पण, त्यात गगनभेदीचे पत्रकार अनित थत्ते यांच्या व्हायरला क्लिपचा दाखला दिला आहे.