मुंबई – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. त्यामुळे ते आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार का?, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतू खडसे नुकतेच ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत.
माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना काल सकाळी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. त्यानंतर दुपारी खडसे यांना ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. खडसे यांना आज सकाळी अकरा वाजता ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे कळविण्यात आले होते. खडसे ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यानंतर मात्र, आज सकाळी राष्ट्रवादीने खडसे यांची प्रकृती बिघडल्यामुळे आजची पत्रकार परिषद रद्द करण्यात येत असल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. पत्रकार परिषद रद्द झाल्यामुळे खडसे ईडीच्या कार्यालयात जाणार नाहीत, अशी माहिती समोर येत होती. परंतू खडसे थोड्याच वेळापूर्वी ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
चौकशीला जाण्याअगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की ही चौकशी राजकीय हेतूने प्रेरीत आहे, पाच वेळा चौकशी झाल्यानंतर पुन्हा चौकशी होत आहे. गेल्या आठ दहा दिवसात व्हॅाटअॅपवर जळगावमध्ये एक मेसेज फिरतो आहे. त्यात कुछ तो होनेवाला आहे याचा अर्थ कार्यकर्त्यांना हे अगोदरच माहित आहे. मी ईडीला नेहमीच सहकार्य केले, आज जे प्रश्न विचारणार आहे त्याला उत्तर देणार आहे. ज्या भूखंडाबाबत चौकशी सुरु आहे. तो मुळातच वादग्रस्त असल्याचेही ते म्हणाले.