नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, दिल्लीतील नागरिकांनी खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या खरेदीचा नवा उच्चांक नोंदवला आहे. २ ऑक्टोबर रोजी ‘गांधी जयंती’च्या दिवशी, रिगल बिल्डिंग, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली येथील ‘खादी भवन’ ने एका दिवसात प्रथमच, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांची सर्वाधिक, म्हणजेच २ कोटी १ लाख ३७ हजार रुपयांची विक्री केली. खादी आणि ग्रामोद्योगाच्या इतिहासात, देशातील एखाद्या खादी भवनाने नोंदवलेला हा सर्वोच्च विक्रम आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार यांनी, गांधी जयंतीनिमित्त बापूजींचा वारसा असलेल्या खादी उत्पादनांच्या अभूतपूर्व विक्रीचे श्रेय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ब्रँड पॉवर’ला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांमध्ये विकसित झालेल्या ‘चरखा क्रांती’ला दिले आहे.
गेल्या काही वर्षांत दरवर्षी गांधी जयंतीला खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीचा नवा विक्रम नोंदवला जात आहे, ज्यामधून हेच दिसून येते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भरभराटीला आलेली ‘चरखा क्रांती’, आता ‘विकसित भारताची हमी’ बनली आहे.
विक्रीच्या ताज्या आकडेवारीनुसार, गांधी जयंतीनिमित्त दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील खादी भवन येथे 2.01 कोटी रुपयांची खादी आणि ग्रामोद्योग उत्पादने विकली गेली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कॉटन खादीची सर्वाधिक विक्री झाली.