मुंबई – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकीनी खडसे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास त्यांना अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी सत्र न्यायालयाने मंदाकीनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज या प्रकरणावर सुनावणी झाली त्यात मंदाकिनी खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. गेल्या काही दिवसापासून खडसे यांच्या अडचणीत वाढ होत होती. पण, या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना अटकपूर्व जामीन मिळाला असला तरी ईडीचा ससेमिरा कायम राहणार आहे. खडसे यांना १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी ईडी, विशेष न्यायालयासमोर हजर राहावेच लागणार आहे. तर दुसरीकडे याच प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांना वैद्यकीय कारणांमुळे दिलासा मिळाला होता. त्याची आता पुढील सुनावणी येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.