मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळे हिला न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी तिने अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकली होती. त्याप्रकरणी ती पोलिस कोठडीत होती. आज तिची कोठडी संपल्याने तिला न्यायालयात हजर करण्यात आले. केतकीचा लॅपटॉप आणि मोबाईल हस्तगत केला असून त्याची चौकशी करण्यासाठी आणखी ५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. मात्र, न्यायालयाने त्यास नकार दिला. न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, केतकीच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण, तिच्यावर राज्यातील १५ ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, गोरेगाव (मुंबई), नाशिक, पवई, पुणे, आमरावती आणि पिंपरी चिंचवड या शहरांचा समावेश आहे. ठाणे न्यायालयाच्या निर्णयानंतर आता मुंबई पोलिस तिचा ताबा घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यामुळे आता पुढे काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.