मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. केतकीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी सायंकाळी अटक केली होती. केतकीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तिच्यावर अटकेची कारवाई केली होती. आज तिला न्यायालयात हजर करण्यात आले.
राज्यात अनेक ठिकाणी तिच्याविरोधात तक्रारी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आल्या असून नऊ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकी चितळे या अभिनेत्रीने फेसबुकवर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यापासून वातावरण पेटलं आहे. राज्याच्या राजकारणातही यामुळे नव्या विषयाला तोंड फुटलं. आतापर्यंत नऊ पोलिस ठाण्यांमध्ये तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून तयामध्ये कळवा, पुणे, पिंपरी–चिंचवड, सिंधुदुर्ग, अकोला, धुळे, गोरेगाव, पवई, अमरावती येथील पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.
स्वतःच केला युक्तीवाद
केतकीने न्यायालयात स्वतःच्या बचावासाठी वकील घेतला नाही. मी स्वतःच युक्तीवाद करणार असल्याचे तिने न्यायालयाला सांगितले. त्यामुळे ती तिच्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट झाले. केतकी न्यायालयात म्हणाली की, ती पोस्ट माझी नाबी. कारण, सोशल मिडियातून मी ती कॉपी पेस्ट केली आहे. सोशल मिडियावर स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यामुळे मी काही गुन्हा केला आहे का, असा सवालही तिने केला. सोशल मिडियात पोस्ट टाकणे हा माझा अधिकार आहे. ती पोस्ट मी डिलीट करणार नाही, असे तिने न्यायालयात स्पष्ट केले.
या प्रकरणावर शरद पवार यांची प्रतिक्रियाही समोर आली असून, मी केतकी चितळे ओळखत नाही, कोण आहे ती, असं त्यांनी म्हणलं आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रकरणावर भाष्य केले असून, कोणत्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल बोलताना भान राखलं पाहिजे असं म्हणलं आहे. एकूणच केतकीला फेसबुकवरची तिची पोस्ट खूपच महागात पडल्याचे दिसून येत आहे. रात्री उशिरा तिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेत अटक केल्याची माहिती युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली.
नवी मुंबईमधील कळंबोली पोलिस ठाण्यातून बाहेर येत असताना केतकी चितळेवर राष्ट्रवादीच्या काही कार्त्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक केली होती. शिवाय तिच्याविरोधात वेगवेगळ्या भागात आंदोलनदेखील करण्यात येत आहे. सोशल मीडियावरदेखील तिच्याविरोधात पोस्ट टाकून द्वेष व्यक्त करण्यात येत आहे