इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शाळेत असताना मला लॉटरीचे तिकीट लागले तर असा निबंध होता, त्यात आपल्याला कधीही लॉटरीचे तिकीट लागणार नाही, असे माहीत असूनही कल्पनाविलासाने निबंध लिहावा लाग असे परंतु एखाद्याला जर खरोखर लॉटरीचे तिकीट लागले आणि तेही कोट्यावधी रुपयाचे तर त्याची नक्कीच चांदी होईल किंवा दिवाळी साजरी होईल, केरळमधील ११ महिलांचे ही तसेच झाले आहे. विशेष म्हणजे या महिला कचरा वेचणारे असून आता त्यांना प्रत्येकी ७५ ते ९० लाख रुपये मिळणार असल्याने याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. काही जणांना तर ही आश्चर्यकारक घटना वाटत आहे, परंतु प्रत्यक्षात हे खरे आहे.
पहिले पारितोषिक
काही वर्षांपूर्वी मालामाल विकली हा चित्रपट आला होता, अद्यापही तो खूप वेळा बघितला जातो. केरळ मधील मलप्पुरम येथील परप्पनगडी नगरपालिकेतील हरित कर्म सेनेच्या कर्मचारी असलेल्या तथा कचरा वेचणाऱ्या महिलांचेही मालामाल विकली मधील कलाकारांसारखेच नशीब पालटले असे म्हणता येईल, कारण या ११ जणांनी पैसे जमा करून २५०रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले असून या लॉटरीच्या तिकीटाने त्यांच्या जीवनात आता जणू सोन्याचे दिवस आले आहेत. कारण या तिकीटावर त्यांना १० कोटी रुपयांचा पहिले बक्षीस मिळाले आहे. मान्सून बंपर लॉटरीचे पहिले पारितोषिक मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता या घटनेची केवळ नगरपालिका किंवा शहरात असणारे तर संपूर्ण केरळ राज्यात चर्चा सुरू आहे.
२५० रुपयांचे तिकीट
या ११ महिला पालिकेत कचरा गोळा करण्याचे काम करत असताना त्यांनी एक-एक रुपया जोडून २५० रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले. हे तिकीट खरेदी करण्यासाठी ११ पैकी ९ महिलांनी २५ रुपये जमा केले होते तर, इतर दोन महिलांनी प्रत्येकी १२रुपये ५० दिले होते. लॉटरी जिंकणाऱ्या एका महिलेने सांगितले की, गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आम्ही उदरनिर्वाहासाठी घरातून व कार्यालयांमधून जैवविघटन होऊ न शकणारा कचरा गोळा करणाचे काम आम्ही करतो. आम्ही एकत्र लॉटरी जिंकल्याचा आनंद असून आता असेच एकत्र चांगला काम करू.’
घरी फोन आला
या महिला पालिकेच्या हरित कर्म सेना गटाचा भाग आहेत. त्याची नावे अशी : पी पार्वती, के लीला, एमपी राधा, एम शीजा, के चंद्रिका, ई बिंदू, कार्तियायिनी, के शोभा, सी बेबी, सी कुट्टीमालू आणि पी लक्ष्मी या मान्सून बंपर लॉटरी जिंकणाऱ्या भाग्यवान महिला आहेत, परप्पानगडी येथील लॉटरी विजत्या पार्वती यांनी सांगितलं की, आम्ही लॉटरी जिंकणाची कोणतीही अपेक्षा केली नव्हती कारण, त्यांनी पैसे जमा करून विकत घेतलेले ते चौथे लॉटरी तिकीट होते. पण जेव्हा मी काम संपवून घरी परतले तेव्हा माझ्या मुलाने मला विचारले की, तुम्ही तिकीट घेतले आहे का? कारण लॉटरीच्या तिकिटावर बक्षीस जिंकले आहे, असे सांगण्यासाठी घरी एक फोन आला होता.