कोची – आतापर्यंत काँग्रेस, तेलंगणारा राष्ट्र समितीसह इतर राजकीय पक्षांवरच परिवारवादासाठी धारेवर धरले जात आहे. विशेषतः मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) सह त्यांचे सहकारी डाव्या विचारसरणीचे पक्ष परिवारवादाचा मुद्दा वारंवार उपस्थित करत आले आहेत. मात्र केरळमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज असलेल्या माकपामध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आपल्या जावयाला कॅबिनेट मंत्री करण्याचा निर्णय घेतल्याने वाद निर्माण झाला आहे.
केरळमध्ये माकपा राज्य समितीची मंगळवारी बैठक झाली. त्यात पिनराई विजयन यांना पक्षातर्फे सभागृहाचा नेता म्हणून निवडण्यात आले. २० मे रोजी ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत पक्षाच्या ज्या दोन लोकांना मंत्रीपदाच्या शपथ ग्रहणासाठी निवडण्यात आले आहे त्यात मोहम्मद रियाझ यांचेही नाव आहे आणि ते मुख्यमंत्र्यांचे जावई आहेत.
इतर लोकांमध्ये एम. व्ही. गोविंदन, के. राधाकृष्णन, के.एन. बालागोपाल, पी. राजीव, व्ही. एन. वासवान, साजी चेरियन, व्ही. सिवानकुट्टी, डॉ. आर. बिंदू, विणा जॉर्ज तसेच व्ही. अब्दुल रहमान यांच्या नावांचा समावेश आहे. माकपाने यावेळी नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले आहे. गेल्यावेळी पक्षातील जी मंडळी मंत्रीपदावर होती त्यांना यंदाच्या सरकारमध्ये कुठल्याही मंत्रीपदासाठी निवडण्यात आलेले नाही.
यात कोरोना काळात उत्तम काम करणाऱ्या केरळच्या आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांचेही नाव आहे. शैलजा यांना मंत्रीमंडळात जागा न देता पक्षाच्या मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पक्षाने एम.बी. राजेश यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडले आहे तर टी.पी. रामकृष्णन यांना संसदिय दलाचे सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे.