इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केरळ पोलिसांनी अतिशय धक्कादायक रॅकेट उघडकीस आणले आहे. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी चक्क एकमेकांच्या पत्नींची अदला-बदल करणाऱ्या टोळीतील सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात तब्बल १ हजार युगुलांचा समावेश असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. कोट्टायम जिल्ह्यातील कारुकाचल पोलिसांकडे एका महिलेने तक्रार दिली होती. या प्रकरणी २५ हून अधिक नागरिक देखरेखीखाली आहेत. आगामी काळात अनेक जणांना अटक होण्याची चिन्हे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, एक हजारांहून अधिक युगुल हे या समुहामध्ये महिलांची अदला-बदल करत होते. राज्यातील तीन वेगळ्या जिल्ह्यातील आरोपी आहेत. राज्यातील अनेक नागरिक या रॅकेटमध्ये सहभागी आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, समाजातील उच्च वर्गातील काही नागरिक या समुहात सहभागी आहेत. यातील नागरिक सर्वप्रथम टेलिग्राम किंवा एखाद्या मॅसेंजर ग्रुप्समध्ये सहभागी होतात, असे कोट्टायमच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.
नंतर दोन किंवा तीन युगुल वेळोवेळी एकमेकांच्या भेटी घेतात. त्यानंतर महिलांची अदला-बदल केली जाते. समुहातील काही पुरुष पैशांसाठी आपल्या पत्नींना शारीरिक संबंधांसाठी उपलब्ध करून देतात. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. महिलांची अदला-बदल करणार्या समुहात सहभागी नागरिकांचा तपशील मिळविण्यासाठी सखोल चौकशी करण्यात येत आहे. या समुहाचे इतर कोणत्या समुहांशी संबंध आहेत का, याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
केरळ पोलिसांनी सांगितले, सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या संशयितापैकी एकाच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार केली होती. पत्नीच्या तक्रारीनुसार, पती अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होता. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केली आणि या समुहाचा पर्दाफाश झाला.