नवी दिल्ली – एका पदावर नातेवाईकांची नियुक्ती करण्यासाठी वशिलेबाजी करणाऱ्या केरळच्या एका मंत्र्यांना पद सोडण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. केरळचे मंत्री के. टी. जलील नातेवाईकांसाठी वशिलेबाजी करण्यात दोषी आढळले असून, त्यांनी तत्काळ पद सोडावे असे लोकायुक्तांनी म्हटले आहे.
कृषीमंत्री जलील यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर लोकायुक्त न्यायमूर्ती सायरिक जोसेफ आणि उपलोकायुक्त हारुल उल राशिद यांचा अहवाल दिला आहे. जलील यांच्यावर त्यांचे नातेवाईक के. टी अदिब यांना केरळ अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळावर महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यासाठी त्यांच्या कार्यालयाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
महामंडळाच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्तीसाठी योग्यतेचा निकषही बदलण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. पुढील कारवाईसाठी लोकायुक्तांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडे अहवाल पाठवल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने सांगितले. लोकायुक्तांच्या अहवालावर भाजप आणि काँग्रेसने मंत्री जलील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार राहिला नसून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी
विरोधी पक्षनेते रमेश चिन्निथला यांनी केली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयात हे प्रकरण फेटाळले गेले आहे. पुढील कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेणार असल्याचे मंत्री जलील यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून सांगितले.