इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विकृती किती टोकाला जाऊ शकते, याची अनेक उदाहरणे जगात बघायला मिळतात. या विकृतीला होणारी कठोर शिक्षाही सर्वांना माहिती आहे. पण तरीही गुन्हेगारी कमी होत नाही. केरळमधील लुलू मॉल अशाच एका विकृत प्रकारामुळे चर्चेत आले आहे.
केरळमधील लुलू मॉलमध्ये वारंवार विचित्र घटना घडत असतात. बुधवारी या मॉलमधील लेडीज वॉशरूममध्ये एक विचित्र प्रकार उघडकीस आला. एक महिला बुरखा घालून लेडीज वॉशरूमध्ये गेली. त्यानंतर काहीवेळाने ती वॉशरूमच्या बाहेर येऊन बराचवेळ उभी राहिली. सुरक्षा रक्षकाला काहीतरी गडबड वाटल्याने त्याने पोलिसांना कळविले. पोलीस मॉलमध्ये दाखल झाले आणि बुरखा घातलेल्या त्या महिलेची विचारपूस सुरू केली. त्याचवेळी एका महिला पोलिसाने चेहऱ्यावरील बुरखा हटवला असता तो एक २३ वर्षांचा तरुण निघाला.
त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. तर त्याने लेडीज वॉशरूममध्ये एका ठिकाणी छोट्या बॉक्समध्ये मोबाईल ठेवून त्याचा व्हिडियो ऑन करून ठेवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. पोलिसांनी लगेच तो बॉक्स आणि मोबाईल ताब्यात घेतला. तर त्यात वॉशरूममधील बरेच व्हिडियो पोलिसांना आढळले. अभिमन्यू नावाचा हा तरुण नेहमीच हा प्रकार करीत असल्याचेही पोलिसांना लक्षात आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
हा तर आयटी इंजिनीयर
लेडीज वॉशरूममध्ये जाऊन व्हिडियो काढणारा अभिमन्यू नावाचा २३ वर्षांचा तरुण आयटी इंजिनियर असल्याचे पोलिसांना तपासात कळले. इन्फोपार्क येथील एका कंपनीत तो नोकरीला आहे. आणि बुरखा घालून लेडीज वॉशरूममध्ये जाऊन त्याने यापूर्वीही अनेकवेळा हा प्रकार केला आहे, असेही उघडकीस आले आहे.
Kerala IT Engineer Ladies Toilet Burqa Police Crime
Mobile Video Shooting