इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मंदिर आणि पोलीस प्रशासन यांच्यातील वादावर केरळ उच्च न्यायालयाने आज मोठे मोठे भाष्य केले आहे. कोणत्याही मंदिराच्या कार्यक्रमात केवळ राजकीयदृष्ट्या तटस्थ रंगांचा वापर केला जाईल, असा दबाव जिल्हा प्रशासन आणि पोलिसांवर आणता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मेजर वेल्लयानी भद्रकाली देवी मंदिराच्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने प्रशासनाच्या आदेशाला केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कलियुट्टू उत्सवाच्या सजावटीसाठी केवळ भगव्या रंगाला परवानगी देता येणार नाही, असे प्रशासनाने मंदिर बोर्डाला सांगितले होते. यासंदर्भात दाखल झालेल्या दोन याचिकांवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
या याचिकेवर न्यायालयाने म्हटले आहे की, मंदिरातील लोकांची पूजा, कार्यक्रम आणि समारंभांमध्ये राजकारणाची भूमिका असू शकत नाही. भगवा रंग वापरण्यासाठी मंदिराचे पालकत्व असलेल्या बोर्डावर दबाव आणण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार उपासक किंवा भक्ताला नाही. तसेच, मंदिराच्या कार्यक्रमात राजकीय तटस्थ रंगाचा वापर करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीसही दबाव आणू शकत नाहीत. परंपरा आणि श्रद्धेनुसार मंदिरातील कलियुट्टू उत्सवासाठी कोणता रंग वापरायचा हे त्रावणकोर देवस्वोम बोर्ड ठरवेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मंदिर परिसरात किंवा आजूबाजूला काही गैरप्रकार घडू शकतात, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, अशी भीती असल्यास मंदिर मंडळ पोलिसांना कळवू शकते आणि अशा घटना रोखण्यासाठी पोलिस-जिल्हाधिकारी यांना आवश्यक ती पावले उचलावी लागतील.
Kerala High Court on Temple Festival Arrangement