इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्या रुग्णाला स्पर्श न करता त्याचा उपचार करणे डॉक्टरांना शक्य नाही. त्यामुळे एखाद्या रुग्णाला स्वतः स्पर्श अवघडल्यासारखा वाटला असेल तर त्याने अवघड वाटून घेऊ नये, असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने दिला. त्याचवेळी डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकाला अटकपूर्व जामीन सुद्धा नाकारला.
केरळमधील एका रुग्णालयात एका महिलेला तिच्या पतीने भरती केले. भरती करताना जे डॉक्टर ड्युटीवर होते त्यांनी तातडीने उपचार सुरू केला. महिलेची तपासणी सुरू करण्यासाठी संबंधित डॉक्टरने तिला स्पर्श केला. पण महिलेच्या पतीने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता डॉक्टरच्या कानशिलात लगावली. डॉक्टरला मारहाण सुरू केली. त्यानंतर डॉक्टरने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण आरोपीने पळ काढत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली.
याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने महिलेच्या पतीने केलेले कृत्य दुर्दैवी असल्याचे निरीक्षण नोंदवले. डॉक्टर रुग्णाला स्पर्श न करता उपचार करणे शक्यच नाही. उलट डॉक्टरांनीच उपचारासाठी आपली शक्ती आणि आपला वेळ घालवला असतो. त्यामुळे या घटनेची आम्ही गंभीर दखल घेतली आहे, असे न्यायालय म्हणाले. केरळ उच्च न्यायालयाचे न्या. ए. बदरुद्दीन यांनी निरीक्षण नोंदवले की, रुग्णाची तपासणी करण्यासाठी डॉक्टर त्याच्या छातीच्या डाव्या भागावर स्टेथस्कोप लावतात. मग हा स्पर्श केल्याशिवाय उपचार कसा शक्य आहे? अशी प्रकरणं न्यायालय स्वीकारणार नाही.
हे तर धोकादायक
डॉक्टरांना मारहाण करणे दुर्दैवी आहे. त्यातही अश्या प्रकरणांकडे आम्ही गांभिर्याने बघतो. त्यामुळे आरोपीला जामीन दिला तर ते अधिक धोकादायक ठरू शकते. जामीन दिला तर डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम राहील. डॉक्टरांना संरक्षण मिळणार नाही. त्यामुळे आम्ही आरोपीचा अटकपूर्व जामीन नाकारत आहोत, असा निर्णय न्यायालयाने दिला.
Kerala High Court on Doctor Patient Anticipatory Bail