तिरुअनंतपुरम (केरळ) – प्रत्येकाच्या आयुष्यात विवाह हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. विवाहेच्छुक जोडपे लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर आपल्या भावी आयुष्याचे स्वप्न वेगवेगळ्या पद्धतीने रंगवत असतात. लग्न धुमधडाक्यात व्हावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु काही वेळा प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर ऐनवेळी निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे केलेल नियोजन बिघडून जाते. अशीच काहीशी घटना केरळमधील अलप्पूजा येथे घडली आहे.
केरळमध्ये तीन दिवस विनाशकारी मुसळधार पाऊस झाला. राज्याच्या बहुतांश भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. या प्रतिकूल परिस्थितीतही एका जोडप्याने आपले नियोजित लग्न पुढे ढकलले नाही. घोडा, कार किंवा टांग्याऐवजी वधू आणि वर अॅल्युमिनिअमच्या पातेल्यात बसून लग्नाच्या स्थळावर पोहोचले आणि आयुष्याची नवी सुरुवात केली.
अलप्पूजा येथील आकाश आणि ऐश्वर्या हे दोघेही आरोग्य कर्मचारी आहेत. दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. परंतु मुसळधार पावसाने शहरातील रस्ते जलमय झालेले होते. अशा परिस्थितीत नातेवाईकांनी त्यांना स्थानिक भाषेत चेंबू म्हटल्या जाणार्या मोठ्या पातेल्यात बसवून पाण्यात प्रवास करून दोघांनाही लग्नाच्या स्थळी पोहोचविले.
लग्नाची तारीख आधीच निश्चित झाली होती. कठीण पूरपरिस्थितीतही या शुभ कार्याची घटिका टाळण्याऐवजी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यांना चेंबूमधूल विवाह स्थळापर्यंत येण्याचा सल्ला मंदिर प्रशासनाने दिला होता. त्यासाठी मंदिर प्रशासनानेच पातेले उपलब्ध करून दिले. त्यांच्या विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शहरातील बहुतांश भाग पाण्याने वेढलेला आहे. थालावडी येथील मंदिराच्या सभागृहात झालेल्या या विवाह सोहळ्यात खूपच कमी पाहुणे पोहोचू शकले. कोविडमुळे पाहुण्यांची संख्या कमी होती. परंतु कमी पाहुण्यातही विवाह झाल्याने दोघेही आनंदी होते, असे जोडप्याने सांगितले.
https://twitter.com/AFP/status/1450195479170412545