तिरुअनंतपुरम (केरळ) – यंदा देशभरात समाधानकारक पाऊस पडला असून काही ठिकाणी तर ढगफुटी झाली होती.आता परतीच्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये थैमान सुरू आहे. अनेक धरणांमधील पाण्याची पातळी लक्षणीय वाढली आहे. सोमवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी राज्यातील दहा धरणांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करताना काक्की धरणाचे दोन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे दक्षिण आणि मध्य केरळच्या अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
राज्याचे महसूल मंत्री के राजन यांनी पथानामथिट्टा जिल्हाधिकारी कार्यालयात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही माहिती दिली. महसूल मंत्री राजन म्हणाले की, रविवारी संध्याकाळपासून पावसाचा कहर कमी झाला असला तरी, पठाणमथिट्टा येथील कक्की धरणातील पाण्याने धोक्याचे पातळी ओलांडली आहे. आता पुरामुळे नेमकी काय परिस्थिती उद्भवली ते पाहू…
सबरीमाला यात्रेलाही बंदी
राज्यात 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत धरणातून 100 ते 200 क्युमेक्स पाणी सोडणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. कक्की धरण उघडल्यामुळे पंपा नदीच्या पाण्याची पातळी 15 सेमी पर्यंत वाढू शकते. यामुळे थुला मासम पूजेसाठी सबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिरातील यात्रा शुक्रवारपासून बंद करण्यात आली आहे.
मोठे नुकसान
मुसळधार पावसाने आठवड्याभरात 38 जणांना जीव गमवला तर 90 घरेही कोसळली आहेत. एनडीआरएफची टीम पंपा नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना मदत छावण्यांमध्ये नेण्याच्या कार्यात गुंतलेली आहे. गरज पडल्यास हवाई मार्गाने लोकांना बाहेर काढण्याची तयारी आहे.
सतर्क रहा
केरळचे जलसंपदा मंत्री रोशी ऑगस्टीन यांनी सांगितले की, पेरियार नदीवरील इडुक्की धरणाची पाणी पातळी मंगळवारी सकाळपर्यंत 2398.86 फुटांपर्यंत पोहोचली आहे. अशा परिस्थितीत परिसरातील जनतेने सतर्क राहण्याची गरज आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचे दोन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.