इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अलीकडे कोण काय आणि कसे वागेल हे काही सांगता येत नाही. नाहीतर प्रसिद्ध असूनही केरळमधील थोप्पी याला असे का वागावे वाटले असेल, हे सांगता येत नाही. एका दुकानाच्या उद्घाटनाला त्याला बोलावले आणि तेथे त्याने काही अश्लील शब्दांचा वापर केला. यामुळे पोलिसांना त्याच्यावर कारवाई करत अटक करावी लागली आहे. स्थानिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर थोप्पी याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
केरळच्या मल्लपूरममध्ये एका दुकानाच्या उद्घाटनासाठी नुकतेच थोप्पी याला बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमाला लहान मुले देखील उपस्थित होती. त्यांच्यासमोर काही अश्लील शब्दांचा वापर करणे, तसेच गर्दी जमा करुन वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी या युट्युबरला कोचीतील एका घरातून अटक केली. थोप्पी ज्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून गेला होता, तेथे कार्यक्रमात गाणे म्हणतात अश्लील शब्दांचा प्रयोग थोप्पीने केला. त्यामुळे, थोप्पी आणि दुकानाच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक झाली तेव्हा थोप्पीने आपल्या फोनवर लाईव्ह रेकॉर्डींग सुरू केले होते, त्यामुळे पोलीस आल्याची आणि त्याला अटक केल्याची बातमी सोशल मीडियातून सर्वांपर्यंत पोहोचली.
कोण आहे थोप्पी?
युट्यूबर थोप्पी याचे खरे नाव निहाद असून तो कन्नुर जिल्ह्याचा रहिवाशी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. यात लहान मुलांचाही समावेश आहे.