विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली/कोची
केरळमध्ये पुन्हा एलडीएफचे वर्चस्व कायम असून येथे डाव्यांचीच सरशी झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पिनराई विजयन हे मुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत. तर, भाजपने मेट्रोमॅन श्रीधरन यांचा खेळलेला पत्ता साफ अपयशी ठरला आहे. भाजपने येथे मोठा जोर लावला पण त्यांना साधे खातेही उघडता आले नाही.
केरळमध्ये मतमोजणी सुरू झाल्यापासून सत्ताधारी एलडीएफ आघाडीवर होता , आता या पक्षाने ९३ जागांवर विजय मिळविला आहे. केरळमध्ये एकूण १४० जागांपैकी बहुमतांसाठी ७१ जागा आवश्यक असताना एलडीएफने आता स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांचा सत्तेचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे यूडीएफ ४५ जागांवर विजयी ठरला आहे. भाजपाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
केरळ राज्यातील निकालांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. राज्यांतील काही मतदारसंघात सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये चुरस बघायला मिळाली, मात्र, नंतर चित्र एकतर्फी होत गेले असून केरळमध्ये पुन्हा एकदा पिनराई विजयन मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. कारण केरळने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारने कोरोना संकटावर यशस्वी मात केली आहे. मागील वर्षी कोरोनाचा सर्वात आधी प्रादुर्भाव होऊनही केरळने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही, याची काळजी घेतली. त्यांनी करोनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची दखल मतदारांनी घेतल्याचं दिसत आहे.
केरळमध्ये प्रत्येक पाच वर्षांनंतर सत्तांतर होते. परंतु आता काही वर्षांनंतर प्रथमच दुसऱ्यांदा पुन्हा एकाच पक्षाचे सरकार सत्तेत येणार आहे. देशभरात भाजपचा आणि विशेषत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलबाला होत असताना केरळ विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचीच पुन्हा सरशी होणार असल्याचा अंदाज एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आला होता.
केरळ विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून मुख्यमंत्री पिनराई विजयन, आरोग्य मंत्री के.के. शैलजा, काँग्रेसचे नेते ओमेन चंडी आणि रमेश छेन्नीथाला भाजपचे उमेदवार व मेट्रो मॅन ई. श्रीधरन हे महत्त्वाचे नेते आघाडीवर होते. केरळमध्ये दर वर्षांनी सत्ता बदल होतो, मात्र यंदा मुख्यमंत्री विजयन यांच्या नेतृत्वात डाव्या आघाडीला पुन्हा संधी मिळाली विजयन यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात पुन्हा सत्ता येण्याची दाट शक्यता आहे.
—
आकडेवारी अशी (दुपारी ४ वाजेपर्यंत)
एकूण जागा – १४०
बहुमतासाठी आवश्यक जागा – ७१
एलडीएफ – ९७
युडीएफ – ४३
भाजप – ०