नवी दिल्ली – कोरोनाच्या तिस-या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. गेल्या फक्त पाच दिवसांत कोरोनाचे दीड लाख रुग्ण आढळल्याने यंत्रणेची झोप उडाली आहे. देशात केरळच्या आकडेवारीमुळे दररोज ४५ हजारांच्यावर रुग्णांचा आकडा जात आहे. परिस्थिती पाहून मुख्यमंत्री पी. विजयन यांनी पुढील आठवड्यापासून रात्रीची संचारबंदी लावण्याची घोषणा केली आहे. शनिवारी देशात कोरोनाचे ४५ हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. त्यामध्ये ३१ हजारांहून अधिक रुग्ण केरळमधील होते. देशातील एकूण रुग्णांपैकी केरळमधील रुग्ण जवळपास ७० टक्के आहेत. शुक्रवारी केरळमध्ये संसर्गाचा दर १९/२२ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. शनिवारी तोच दर १८/६७ टक्के होता.
पाच दिवसांत ५० हजार रुग्ण
कोरोनामुळे केरळमध्ये शनिवारपर्यंत दोन लाखांहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत. देशात कोरोनाचे एकूण ३/७ लाख सक्रिय रुग्ण आहेत. एकट्या केरळमध्ये ५५ टक्के रुग्ण आहेत. गेल्या पाच दिवसांत केरळमध्ये ५० हजार सक्रिय रुग्ण वाढले आहेत. यादरम्यान एक लाख ४९ हजार ८१४ नवे रुग्ण आढळले आहेत. केरळशिवाय महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाचे ४ हजार ८३१ नवे रुग्ण नोंदविले आहेत. मिझोरममध्येसुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वाढ होत आहे. दोन दिवसांत कोरोनाचे एक हजार रुग्ण आढळले आहेत.
मृतांमध्ये केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण
भारतात शनिवारी कोरोनामुळे एकूण ४४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १५३ मृत्यू एकट्या केरळमधील आहेत. त्याशिवाय १२६ महाराष्ट्र, ६८ ओडिशा, २१ तामिळनाडू आणि १९ मृत्यू आंध्र प्रदेशात झाले आहेत.