नवी दिल्ली – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार तसेच देशभरातील विविध राज्यातील शासन व प्रशासन यांच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु अद्यापही देशाच्या काही भागात कोरोनाची लाट कायम असल्याचे दिसून येत आहे. किंबहुना आता तिसऱ्या लाटेचा धोका वाढण्यापुर्वी काही भागात कोरोना संसर्गात आणखी वाढ होत आहे. विशेषत : सणासुदीच्या काळात हा संसर्ग धोका अधिक दिसून येत आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये नुकताच ओणम सण साजरा झाला, त्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे.
कोरोना महामारी रोखण्यासाठीच्या उपायांचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या सणासुदीच्या महिन्यांत कठोरपणे पालन करून घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारांना गुरुवारी दिले. कोविड-१९ ची दुसरी लाट अजून विरलेली नाही आणि प्रत्येक सणानंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसले आहे, असे केंद्राने म्हटले. देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत केरळचा ओणम महोत्सवानंतरचा वाटा हा ५८.४ टक्के आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रात देखील सण उत्सवाच्या काळात कोरोना संसर्गामध्ये यापूर्वी वाढ झालेली दिसून येते. मग सातारा जिल्हयातील बगाड यात्रा असो की, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरची आषाढी यात्रा असो. या काळात या ठिकाणी कोरोना संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच सध्या केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कारण या राज्यामध्ये नुकताच ओनम हा सण साजरा झाला. तिथे गर्दी झाली होती. त्यामुळे एकाच दिवसात मोठी रुग्णसंख्या वाढली. दरम्यान, याबाबत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना स्थितीची माहिती दिली. टोपे म्हणाले की, मी स्वत: केरळच्या आरोग्य मंत्र्यांशी फोन करुन बोललो. त्यांच्याकडे ३१ हजार केसेस एकाच दिवसात आल्या. तिसऱ्या लाटेची सुरुवात केरळमधून झाली असे समजायचं का? असेही टोपे म्हणाले.
दरम्यान, प्रत्येक सणानंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसले आहे, असे केंद्र सरकारने म्हटले असून देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत केरळचा ओणम या महोत्सवानंतरचा वाटा हा ५८.४ टक्के आहे. ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत १० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. महाराष्ट्रातही रुग्णसंख्या घटली असून तेथे उपचाराधीन रुग्ण १६ टक्के, कर्नाटकमध्ये ५.५८, तमिळनाडूत ५.५ आणि आंध्र प्रदेशमध्ये ४.२१ टक्के आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केरळला गेले असून राज्याच्या नेतृत्वाने कटाक्षाने पावले उचलली पाहिजेत असे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर तेथे ओणमनंतर कोविड पसरला. कोणत्याही परिस्थितीत आगामी सणासुदीच्या दिवसांत कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी जास्तीत जास्त काळजी घेऊन उपाय योजना करावी, केंद्र सरकारने राज्यांना सूचित केले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुरेशी उपाययोजना केली असून पुढील दोन महिने खूप सावध राहावे लागेल राज्यांनी लशीकरणाचा वेग वाढवावा आणि अपेक्षित लक्ष्य गाठावे, असेही म्हटले आहे.