इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नाशिकमधील ब्रह्मा व्हॅली स्कूलचे चार विद्यार्थी पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रात बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकूण पाच विद्यार्थी बुडाले मात्र, त्यातील एकाला वाचविण्यात यश आले आहे. तर दोन जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळवे समुद्र किनारी नाशिकच्या ब्रह्मा व्हॅली स्कूलचा मोठा ग्रुप पर्यटनासाठी आला होता. त्याचवेळी स्थानिक मुले समुद्र किनारी खेळत होती. समुद्राला ओहोटी असल्याने ही दोन्ही मुले समुद्रात बुडत असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. या मुलांना वाचविण्यासाठी ब्रह्मा व्हॅली स्कूलचे काही विद्यार्थी पुढे सरसावली. चार ते पाच विद्यार्थ्यांनी तातडीने समुद्रात उडी मारत त्या विद्यार्थ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे सर्व विद्यार्थी समुद्रात बुडत असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने स्थानिक व्यक्ती, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक आदींनी या सर्व मुलांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्याचवेळी काही जणांनी पोलिसांशीही संपर्क साधला. या मदतकार्यात एकाला वाचविण्यात यश आले आहे तर, चार जणांचा बुडून मृत्यू झाल आ)हे. अद्यापही दोन जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये ओम विसपुते (वय १७ वर्षे, रा. नाशिक), अथर्व नाकरे (वय १३ वर्षे, रा. नाशिक), कृष्णा शेलार (वय १७ वर्षे, रा. नाशिक), दीपक वडकाते (वय १७ वर्षे, रा. नाशिक) यांचा समावेश आहे. तर अभिलेख देवरे (वय १७ वर्षे, रा. नाशिक) या विद्यार्थ्याला वाचविण्यात यश आले आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा असून बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे.