नवी दिल्ली – अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’, हा शो दर्शकांचा फारच आवडता आहे. म्हणूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या कार्यक्रमात सहभागी होतात. नुकतीच या खेळात एक महिला करोडपती झाली. तिच्यापाठोपाठ आता दुसरा करोडपती देखील या १२ व्या सीझनला मिळाला आहे. करोडपती होण्यात यशस्वी झालेली ही दुसरी व्यक्ती देखील महिलाच आहे. त्या आहेत आयपीएस अधिकारी मोहिता शर्मा.
नाजिया नसीम यांच्यानंतर मोहिता यांना करोडपती होण्यात यश आले आहे. मात्र, १ कोटी जिंकल्यानंतर त्या सात कोटी जिंकणार का, याची उत्सुकता होती. सात कोटींच्या प्रश्नाचे उत्तर मोहिता यांना आले नाही. त्यामुळे त्यांनी हा खेळ सोडला.
एक कोटींसाठी मोहिता यांना विचारण्यात आलेला प्रश्न असा
यातील कोणत्या विस्फोटक पदार्थाचा वापर सर्वप्रथम दुसऱ्या महायुद्धात करण्यात आला होता आणि ज्याचे पेटंट जर्मन रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज फ्रेडरिक हेनिंग याच्या नावावर होते?
a : एचएमएक्स
b : आरडीएक्स
c : टीएनटी
d: पीईटीएन
या प्रश्नाचे आरडीएक्स हे योग्य उत्तर देऊन मोहिता करोडपती तर झाल्या. पण यानंतरच्या सात कोटींसाठीच्या प्रश्नावर त्या अडखळल्या.
वाडिया समूहाने निर्माण केलेले यातील कोणते जहाज १८१७ मध्ये लॉन्च करण्यात आले? जी ब्रिटनची सर्वात जुनी युध्द्धनौका आहे?
a : एचएमएस मिंडेन
b : एचएमएस कॉर्नपरलीस
c : एचएमएस त्रिनकोमाली
d : एचएमएस मिनी
याचे योग्य उत्तर एचएमएस त्रिनकोमाली हे होते, पण ते न आल्याने त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
मोहिता या हिमाचल प्रदेशातील असून आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे पोस्टिंग जम्मू – काश्मीर येथे आहे. जम्मू – काश्मीरच्या वनविभागातील अधिकारी रुषल गर्ग यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला आहे.








