मुंबई – कौन बनेगा करोडपतीचा १२वा सिझन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे होस्ट अमिताभ बच्चन पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. कार्यक्रमात एका स्पर्धकाला विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे देशभरातून अमिताभ यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. याच संदर्भात भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी अमिताभ आणि सोनी टीव्हीविरोधात तक्रार केली आहे.
बच्चन यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केला आहे. २५ डिसेंबर १९२७ रोजी भीमराव आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कोणत्या शास्त्राच्या प्रती जाळल्या होत्या ? असा प्रश्न स्पर्धकाला विचारण्यात आला. प्रश्नाच्या उत्तरासाठी विष्णु पुराण, भगवद्गीता, ऋग्वेद आणि मनुस्मृती असे पर्याय देण्यात आले. प्रश्न विचारण्याचा उद्देश चांगला असल्यास भिन्न धार्मिक ग्रंथांचे पर्याय द्यायला हवे असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर अमिताभ आणि सोनी टीव्ही यांनी हिंदू आणि बौद्ध धर्मांत अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. सदर प्रकरणाविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली आहे.