मुंबई – कौन बनेगा करोडपती हा रिअॅलिटी शो वर्ष २००० पासून आपले सर्वांचे मनोरंजन करतो आहे. आजपर्यंत अनेकांनी या शो च्या माध्यमातून लक्षावधी रुपये जिंकले आहेत. शो चे होस्ट महानायक अमिताभ बच्चन यांच्यापुढे हॉट सीट वर बसायला मिळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते ते म्हणजे करोडपती होण्याचे. पण आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल की, करोडपती झाल्यावर आणि १ कोटी रुपये जिंकल्यावर सुद्धा बक्षिसाची संपूर्ण रक्कम ही विजेत्याला कधीच मिळत नसते. करोडपती झाल्यानंतर नेमके किती पैसे हातात येतात याबद्दल आज जाणून घेऊया.
इतके पैसे होतात कट
आयकर कायद्याच्या कलम १९४ नुसार जिंकणाऱ्या खेळाडूच्या एकूण बक्षीस रकमेतून ३० लाख रुपये सरसकट कर म्हणून कमी होतात. याशिवाय नियमानुसार ४ टक्के सेस म्हणजेच उपकर द्यावा लागतो. त्याची रक्कम जवळपास १ लाख २० हजार इतकी होते. एकूण काय तर १ कोटी रुपयांच्या रकमेतून ३१ लाख २० हजार रुपये करापोटी जातात आणि ६८ लाख ८० हजार रुपये विजेत्यास प्राप्त होतात. आयकराचे हे निमय १० हजार आणि त्याहून अधिक रक्कम जिंकणाऱ्या सर्व विजेत्यांना लागू होतात. इतके पैसे कर म्हणून कमी झाल्यानंतर सुद्धा एक चांगली रक्कम विजेत्यांना प्राप्त होते, हे मात्र खरे.