भोपाळ – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एखाद्या विशिष्ट क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना ‘कर्मवीर’ म्हणून बोलावण्यात येते. यावेळी ‘कर्मवीर’ म्हणून मध्यप्रदेशमधील एक शाळेच्या प्रिन्सिपलना बोलावण्यात आले आहे. जहांगीरबाद येथील शासकीय कन्या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. उषा खरे यांनी ही शाळा हायटेक करून टाकली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांना का कार्यक्रमात बोलावण्यात आले आहे. १८ डिसेंबर रोजी हा भाग प्रदर्शित होणार आहे.
डॉ. खरे यांना २०१७ मध्ये राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारही देण्यात आला आहे. डॉ. खरे यांनी ही शाळा हायटेक केली असून येथे विद्यार्थिनी टॅबवर शिकतात. सध्या या शाळेत १२०० मुली शिकत आहेत. येथील जवळपास ३०० विद्यार्थिनींना मायक्रोसॉफ्टकडून निःशुल्क प्रशिक्षण दिल्यानंतर नोकरीची संधी देखील दिली जाते.