नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समाजामध्ये अनेकांना मानसिक आधाराच्या उपचाराची गरज असते पण नाशिकमध्ये इतक्या चांगल्या संस्था उपलब्ध आहेत याबाबत नागरिकांमध्ये जागृती होण्याची गरज असून मन या विषयावर कविता करतांना मन कसे आहे हे सांगून चालणार नाही, तर एखाद्या व्यक्तीच्या मनातले काहूर, मनातले भावविश्व हे त्याच्या कवितेतून प्रगट झाले पाहिजे. कविता ही अंतरमनाच्या सादरीकरणाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार प्राजक्त देशमुख यांनी केले. सारस्थ मानसोपचार व्यसनमुक्ती व पुर्नव्यसन केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवारी आयएमए सभागृहात मराठी काव्य स्पर्धा झाली. या काव्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी राजू देसले, मानसोपचार तज्ञ डॉ. उमेश नागापूरकर, डॉ. जयंत ढाके, डॉ. अनुक भारती, डॉ. नकुल वंजारी, डॉ. प्रियंका भारती, डॉ. स्वाती वंजारी, डॉ. मनिषा जेजूरकर, डॉ. निलेश जेजूरकर आदी उपस्थित होते. प्राजक्त देशमुख म्हणाले की, युध्दावरची कविता करतांना बॉम्ब कसा होतो, तो कुठे पडला हे सांगून चालणार नाही. तर ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी असलेल्या मानवाचे भावविश्व युध्दाच्या कवितेतून आले पाहिजे.
यावेळी मनातील कविता व कवितेतील मन या विषयावर काव्यस्पर्धा झाली. राजू देसले म्हणाले की, कवितेतून कविचे मन प्रगट होत असते. कवितेतील शेवटचे विधान हीच खरी कविता असते. औरंगाबादच्या मानसोपचार तज्ञ डॉ. मोनाली देशपांडे यांनी मनाविषयी कविता सादर करून सर्वांनीच दाद मिळविली.
डॉ. जयंत ढाके म्हणाले की, मनातील अनेक भावना त्यात पहायला मिळतात. विवेकाने मनावर कसा आवर घालावा हे दासबोध सांगते. डॉ. निलेश जेजूरकर म्हणाले की, समर्थ रामदासांनी जगण्याची उत्तरे आपल्या काव्यातून दिली आहेत. यावेळी विविध वक्त्यांनी मन या विषयावर आपले विचार प्रकट केले. यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेला भारतातूनच नव्हे तर विदेशातूनही प्रतिसाद मिळाला. काही निवडक कवितांचे सादरीकरण करण्यात आले.
पारितोषिक खालीलप्रमाणे
खुला गटामध्ये,
प्रथम – मनातला गुंता : डॉ. जय भाऊसाहेब देशमुख, द्वितीय – मनांकुर : सुनिता हांडोरे, तृतीय – मन : वृषाली गंधे (मुंगी)
उत्तेजनार्थ
डॉ योगिता महाजन
विदुला पुरोहित
महाविद्यालीयन गट
प्रथम – नवा मोगरा : मानसी कावळे, द्वितीय – माझ्यातलं कासव : सिध्दी देशपांडे, तृतीय मन : प्रेरणा पुंडे
उत्तेजनार्थ १- तेजाळणारा दिवा : पुष्कर सोनवणे, उत्तेजनार्थ २ – मन: शरणू खाचणे
यावेळी परिक्षक म्हणून कवी राजू देसले व कवी राजेंद्र उगले यांनी काम पाहिले.