नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने ‘विशाखा काव्य पुरस्कार – २०२४’ जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यानुसार ‘तुझं शहर हजारो मैलांवर’ या कवयित्री सुनीता डागा (रा. वडगाव शेरी, जि. पुणे) यांच्या काव्यसंग्रहाची प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. द्वितीय व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार अनुक्रमे ‘माती मागतेय पेनकिलर’ (कवी सागर जाधव जोपुळकर, रा. चांदवड, जि. नाशिक) व ‘दंगल होतेच कशी?’ (कवी गौतम राजू ढोके, रा. बडनेरा, जि. अमरावती) यांच्या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने दरवर्षी नवोदित कवींच्या प्रथमतःच प्रकाशित काव्यसंग्रहाला ‘विशाखा काव्य पुरस्कार’ दिला जातो. सन २०२४ च्या विशाखा काव्य पुरस्कारासाठी विद्यापीठास एकूण २७ काव्यसंग्रह प्राप्त झाले होते. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखालील गठीत समित्यांनी ही द्विस्तरीय निवडप्रक्रिया पार पाडली. त्यानुसार प्राथमिक छाननी समितीने अंतिम निवडीसाठी नऊ काव्यसंग्रह निवडून दिले तर अंतिम निवड समितीने त्यातून पुरस्कारांसाठी निवड केली. या निवडप्रक्रियेचे समन्वयक म्हणून कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे यांनी काम पहिले.
अंतिम निवड समिती सदस्य म्हणून डॉ. नंदकुमार मोरे (कोल्हापूर), श्री. प्रवीण दशरथ बांदेकर (सावंतवाडी), डॉ. प्रज्ञा दया पवार (ठाणे) यांनी काम पहिले. या विजेत्या पुरस्कारार्थींचे विद्यापीठाचे मा. कुलगुरु प्रा. डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड यांनी अभिनंदन केले आहे. या विशाखा काव्य पुरस्कार – २०२४ तसेच मागील घोषित झालेल्या विशाखा काव्य पुरस्कारांचा एकत्रित वितरण समारंभ विद्यापीठाच्या एखाद्या विभागीय केंद्रावर लवकरच समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.