नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोमंत विद्या निकेतन गोवा या संस्थेचा अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘गोमंतदेवी साहित्य पुरस्कार२०२२’ मराठीतील प्रसिद्ध कवी व गीतकार प्रकाश होळकर यांना जाहीर झाला आहे. १११ वर्षांची परंपरा असलेल्या गोमंत विद्या निकेतन, मडगाव ही संस्था कविवर्य दामोदर अच्युत कारे या कविवर्य बा.भा.बोरकर यांना समकालीन असणाऱ्या गोव्याच्या भूमीतील ज्येष्ठ कवींच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी,’ गोमंतदेवी साहित्य पुरस्कार ‘ मराठीतील श्रेष्ठ कवीला सन्मानपूर्वक देत असते.
यापूर्वी कविवर्य ग्रेस , ना. धो. महानोर , वसंत आबाजी डहाके , अरुणा ढेरे , अनुराधा पाटील , विठ्ठल वाघ, इंद्रजीत भालेराव ह्या ज्येष्ठ साहित्यिकांना गोमंतदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.संगीत शास्त्राचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ संपादक श्री. मुकुंद संगोराम यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार फोमेंतो एन्फीथीएटर मडगाव, गोवा येथे दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल.
यापूर्वी प्रकाश होळकर यांना मराठीतील अनेक प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कार मिळाले असून महाराष्ट्र शासनानेही त्यांनी लिहिलेल्या चित्रपट गीत लेखनासाठी ‘ ग. दि. माडगूळकर राज्य पुरस्काराने’ पाच वेळेस सन्मानित केले आहे.
त्यांच्या ‘कोरडे नक्षत्र’ काव्यसंग्रहाचा महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. इंग्रजी, हिंदी, गुजराती, उडिया या भाषेतही कवितांचे अनुवाद झालेले आहेत. गोमंतदेवी पुरस्काराबद्दल होळकर यांचे साहित्य क्षेत्रात सर्वत्र अभिनंदन होत आहे.