जगण्याच्या संघर्षातून आणि
मनाच्या कोलाहालातून लिहिणारा कवी
कवी प्रा.डॉ.चंद्रकांत पोतदार हे तसे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नेज या गावचे. परंतु नोकरीच्या निमित्ताने ते कोल्हापूर जिल्ह्यातील चंडगड तालुक्यातील हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून सेवेत आहेत. एम.ए. झाल्यानंतर त्यांनी ‘कवी ग्रेस यांच्या साहित्याचा अभ्यास’ या विषयावर कोल्हापुच्या शिवाजी विद्यापीठामधी संशोधन केले. त्याचबरोबर ‘आधुनिक मराठी कवितेतील मातृप्रतिमेचे चित्रण’ हा लघुसंशोधन प्रकल्प पूर्ण करून विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली येथे सादर केला. ‘आत्म्याचा अभंग,’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे अनुदान योजनेतून प्रकाशित झाला. ‘तरीही सोबतीला असतात श्वास ’, प्रकाशवाटेवरच्या कविता,’ ‘ स्वप्नांच्या पडझडीनंतर’ हे तीन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ‘मौनातले अक्षरधुके,’ व ‘आस्वादाची काही पाने,’ हे दोन समीक्षाग्रंथ ‘ शोधयात्रा, डॉ. बाबूराव गायकवाड यांचे समीक्षालेखन,’ व ‘निवडक ज्ञानेश्वर कोळी’, या दोन ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. नेज येथे १० ग्रामीण साहित्य संमेलनांचे त्यांनी यशस्वी आयोजन केले होते. साहित्य, नाट्य चळवळीत जिल्हा, राज्य राष्ट्रीय पातळीपर्यंत सातत्याने सहभाग असतो. केंद्र शासन पुरस्कृत सर्जनशील लेखन शिबिरात त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली होती. बंडलागुडा, हैदराबाद तसेच महाराष्ट्र-कर्नाटकात विविध विषयांवर अनेक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. ‘धनगरवाडा’ या मराठी चित्रपटात अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे समवेत भूमिका केली आहेत. ‘नकोशी’ लघुपटात त्यानी भूमिका साकार केली आहे. अ.भा.मराठी साहित्य संमेलनं,विभागीय साहित्य संमेलनात त्यांनी अनेकदा सहभाग घेतला आहे. त्यांना कोल्हापूरच्या ए. एस. प्रकाशन संस्थेचा ‘युवा गौरव पुरस्कार,’ पुणे येथील बंधुता प्रतिष्ठानचा प्रबोधनयात्री पुरस्कार, प्रणव प्रतिष्ठान, श्रीपूर, जि. सोलापूरचा ‘अक्षरगंध काव्यपुरस्कार,’ पुणे येथील गदिमा प्रतिष्ठानचा ‘गदिमा काव्यपुरस्कार’, आरग (सांगली)चा स्व.चैतन्य माने पुरस्कार, अहमदनगरचा ‘शब्दगंध काव्य पुरस्कार,’ रेंदाळचा ‘कै. ए. पां. रेंदाळकर पुरस्कार,’ भुतरामहट्टी, कर्नाटक विद्यापीठ, बेळगावचा महात्मा फुले कार्यकर्ता पुरस्कार, अकोला येथील विदर्भ साहित्य संघाचा ‘अंकुर वाङ्मय पुरस्कार’ मिळालेले आहेत.
खरं म्हणजे कवीच्या प्रत्येक कवितेमागे कवीच्या उभ्या आयुष्याची माती असते. त्याला कवी प्रा.डॉ. चंद्रकांत पोतदार यांची कविता अपवाद कशी ठरणार ? कवी पोतदार यांची कविता जगण्याच्या जीवन संघर्षातून आणि मनाच्या कोलाहालातून जन्माला आलेली आहे. त्यामुळे कवी चंद्रकांत पोतदार यांची कविता कवीचं सकलसमांतर जगणं घेऊन कविता प्रवाहित होताना दिसते.त्यांच्या कवितेतून अवतीभवतीचं वास्तव सहजपणे अभिव्यक्त होतांना दिसतं. सामाजिक वास्तव हे वाचना त्यांच्या कवितेतून प्रकर्षाने जाणवत राहतं. कधीकधी आपल्या आयुष्याचं गणित करतांना आपण जगण्याचं सूत्र हरवून बसतो. या सैरभैरपणात कधीकधी आपण आपलं विश्वासाचं बोट सोडून देतो. नात्यांच्या बेरीज वजाबाकीत आपण आपलंच उणे करीत असतो. आणि मग नात्यांच्या सगळ्या जखमा सांभाळनं कठीण होऊन बसतं. काळजाचं देणं घेणं संपतं, तेव्हा मुळं सोडत असतात मातीला.आणि माणसं सोडत जातात जातीला. अशा जगण्याच्या संघर्षातून मानवी स्वभावाचे फसवे मुखवटे आणि मानवी बुरखे फाडीत त्यांची कविता येतांना दिसते. त्यांच्यातील संवेदनशील मनाला गाव पारखा झाल्याची रुखरुख सतावत राहते.त्यामुळे वेदनेची गाणी ओठांवर दस्तक देत राहतात. सोसलेल्या घावांच्या कळा असाहयतेतून कवितेच्याशब्दातून आरोळ्या मारत सुटतात. प्रत्येक ऋतू खलनायक म्हणून दारात उभा ठाकतो. अशावेळी काळजाचे कढ उतू जातात. आतड्याचे पीळ तुटू पाहतात. काळजावरच्या जखमा चिघळू पाहतात. कोरड्या जखमांच बोलू पाहतात. गळून पडलेली पानं फुटू पाहतात. ढासळेली मनं तगू पाहतात. बांधामेराला, सरी वाफ्याला, झाड मुळं उगू पाहतात.
कवी प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार त्यांची कविता दुःखाच्या खपल्या गाळून पुन्हा बोलू पाहते. काही सांगू पाहते. तिची ती प्रतिकं आणि प्रतिमांतून अभिव्यक्त होऊ पाहते. ती तिचा स्वत:चा चेहरा घेऊन येताना दिसते.त्यांची कविता जागतीकीकरणाच्या प्रारुपावर परखड भाष्य करते.जगण्यांच्या पडझडीनंतर स्वतःच स्वतःला सावरावे कसे ? याचा प्रत्यय देताना दिसते. त्यांच्या कवितेत आजमितीचे वर्तमानाचे सारेच संदर्भ शोधत अधिकधिक तपशिलात उतरत जाते. गाव आणि गावगाड्यातील सर्वसामान्य माणसांच्या जीवनाचा आणि तिथल्या परंपरांच्या वाताहातीचा पंचनामा करते. गाव सोडताना माणसं दुरावली. वाट धरताना गाव हरवलं. बांध सोडताना माती दुरावली.माती सोडतांना नाती दुरावली. ही जगण्याची सगळी ताटातूट सांधताना आणि उभ्या आयुष्याचा गुंता सोडतांना मनातील कोलाहलाचे वास्तवदर्शी चित्र अधिक अधोरेखित करून जाते. तरीही कासावीस होणारं हिरवं मन अजूनही माणुसकीच्या गारव्यावर तग धरून उभं राहतं. हे सारं होऊनही मनाच्या गाभा-यात अनुभवलेलं गाव कवी निरंतर मनात जपताना आणि जगताना दिसतो. या सा-या व्यथावेदना शब्दातून व्यक्त करतो .खोलवर मनात रुतलेले घाव शब्दातून लिंपतो बसतो. या दुःखाच्यासमयी शब्दाशिवाय आसपास कुणी फिरकत नाही. तेव्हा शब्दच कवीचे सोयरे बनतात. सहकार्याचा हात आपुलकीने देत पुढे येतात. हात देऊन उमेद देतात. इथे संत तुकारामांच्या ‘ आम्हा घरी धन ‘ची प्रचीती प्रकर्षाने वाचकाला देत राहतात. कवी पोटासाठी जगण्यासाठी गाव सुटल्याचं अनामिक दुःखं सोबतीला घेऊन आत्म्याचा अभंग गुणगुणत जीवनाच्या प्रकाश वाटेवर चालतो आहे. आणि स्वप्नांच्या पडझडीनंतरही सोबतीला असतात श्वास या विश्वासावर वाटचाल करताना दिसतो. खरं म्हणजे समद्याच वेणा एक होऊन आतड्याला पिळवटून त्याची कविता शब्दातून प्रसवताना दिसते. तिला तिचा स्वत:चा एक पीळ आहे. एक वळ आहे. स्वत:ची लय आहे.जीवनाच्या या धावपळीत काही कमावल्या पेक्षाही काही गमावल्याची दुखरी खंत शब्दाशब्दातून सलते आहे. आयुष्याचं ओझं खांद्यावर घेऊन वाटचाल करतांना मनाची झालेली काहिली आणि तिच्यातून होणारी मनाची घालमेल त्यांच्या कवितेच्या शब्दातून पाझरती होतांना दिसते.
कवी प्रा. डॉ.चंद्रकांत पोतदार यांची कविता भावकीची सारी बंधने आणि मर्यादांचे ओझे खांद्यावर घेऊन येतांना दिसते. कविता काय असते.? कविता म्हणजे उत्स्फूर्त भवनांचा उद्रेक.कविता असते चिंतनशील विचारांचं प्रकट रूप. कवितेत मानवी भावभावनांची स्पंदने असतात. एखाद्या अनुभवावरचं भाष्य मांडते कविता. वाचकाला सूचक असा मंत्र देऊन जाते कविता. कधीकधी वाचकांच्या डोळ्यात अंजन घालते कविता. आयुष्याला चंदनासारखी गंधित करते कविता.कविता अनुत्तरीत प्रश्नांची उत्तर देते. कविता लौकिक अलौकीकाचे गाणे गाऊन जाते.कविता अनेकांना धीर देते. आधार देते. कविता एक शक्ती आहे. कविततेत सामर्थ्य असतं. कविता जगण्याचा श्वास बनते. कवितेसाठी साधना हवी. चिंतन मंथनातून ती आपोआप येत असते. कविता लिहिण्यापूर्वी कवीची असते.शब्द होऊन कागदावर आली की वाचकांची होते. वाचकाला कविता भावते म्हणजे त्याचं भावविश्व ती अनुभवाने प्रज्वलित करते. समृध्द करते. तेव्हाच ती त्याला आपली वाटते.आपल्या भावविश्वातलं काही तरी अनुभूती देणारे असेल ते वाचकाला आपलं वाटतं. पण ‘स्वांतसुखाय’ या न्यायाने बरेच लोक लिहितात. काळाच्या ओघात मर्यादेत गुंतून न पडता काळासोबत प्रवाहीत राहणं महत्वाचं असतं. प्रत्येक शब्दाचं वैभव असतं. सामर्थ्य असतं. म्हणून शब्द जपावा लागतो. शब्द जगावाही लागतो. कविता संवादाचं एक प्रभावी माध्यम आहे. अव्यक्त भवना व्यक्त करण्याचं साधन आहे. एक मात्र खरे की आपली पोतदार यांच्या कवितेतील सकारात्मक नकारात्मकतेचे अनेक संदर्भ वाचकांच्या मनाचा तळ ढवळून काढतात.इस्टेटीला ओलाव्याचा वारसदार कुठे आहे ? असा प्रश्न जेव्हा उभा राहतो तेव्हा भूतकाळ डोळ्यापुढून हाटत नाही . आणि भविष्य सारं अंधारून येतंय. हे असं वर्तमानाला सांगणार तरी कसं ? शेवटी अनुत्तरीत प्रश्नाच्या गाठी पदराला मारीत त्यांची कविता पुढे निघताना दिसते. शेवटी भवना आणि व्यवहाराच्या फटीत सामान्य माणसाचा जीव गुदमरतो. हे मनाचं गुदमरणं स्वप्नांच्या पडझडीनंतर झाडांच्या पान् सगळी सारखं सुरूच राहतं.तेव्हा ते लिहितात ‘रमत नाही माणसं माणसात ? पेटत नाही कुणाच्याच आतड्याचा जाळ ? इस्टेटीला ओलाव्याचा वारसदार कुठे आहे ? इतकं का सोपं असतं गणित आयुष्याचं ? काही केल्या सापडत नाही सूत्र जगण्याचं ? हे असले प्रश्न मांडत त्यांची कविता वाचकांच्या मनात घर करते.या सा-या प्रश्नांच्या तळाशी जखमांचा गाळ आहे. काळजातला जाळ आहे. पायाशी मातीची नाळ आहे. सोबतीला तुकोबाचा टाळ आहे.त्यामुळे मनाची होणारी होरपळ सहन करण्याची क्षमता येत जाते. कवी पोतदार यांच्या जगण्याच्या या सगळ्या पडझडीतून बाहेर पडतांना वाचकांचं मन पिळवटून निघतं. हे मात्र खरं. आज आपण त्यांच्या काही कवितांचा आस्वाद घेऊया.
प्रा. लक्ष्मण महाडिक
९४२२७५७५२३