सामाजिक जीवनातील समाज मनाचा टाहो
कवितेतून मांडणारा कवी : प्रा.बी. एन.चौधरी
कविता ही कवीची अभिव्यक्ती असते. त्या अभिव्यक्तीतून कवी स्वत:ला व्यक्त करत असतो. त्याच्या जाणीवाना तो कवितेचं अवकाश बहाल करत असतो.कविता ही त्याची निर्मिती असते. या मिर्मितीस अनेक घटक मदत करत असतात.त्याच्या अवतीभवतीचं वातावरण त्याच्या काव्य निर्मितीची प्रेरणा बनू शकतं. अवतीभवतीच्या घडणाऱ्या घटना, विविध अनुभव,प्रसंग,सामाजिक वास्तव,निसर्ग, संस्कार,विचारधारा या सारख्या अनेक घटकांचा काव्य निर्मितीमध्ये हातभार लागत असतो. कवी प्रा.बी.एन.चौधरी यांच्या कवितेच्या मागे त्यांचं संवेदनशील मन तितकंच महत्वाचं आहे. ते ज्या वातावरणातून वावरत आले, त्या वातावरणाचा त्यांच्या कवितेवर परिणाम होत गेला.त्यांची कविता निसर्गाबरोबरच सामाजिक जाणीवा घेऊन येते.सामाजिक परिवर्तनाची भाषा करताना दिसते.सामाजिक नितीमुल्यांचा ऱ्हास होताना पाहून त्यांची कविता विद्रोहाची भाषा करताना दिसते.तर कधी समाजव्यवस्थेवर आगपाखड करताना दिसते. अनेक सनातनी रूढी,परंपरा यांच्यावर त्यांची कविता तुटून पडते.यामागे कवी मनावर झालेले विज्ञानाचे संस्कार आहेत.याचा प्रत्यय त्यांची कविता वाचतांना वाचकांना नक्कीच येतो.आज सारा समाज जाती आणि धर्मात वाटला जात आहे.त्यामुळे समाजव्यवस्था दुभंगत आहे.समाजा समाजात दरी पडते आहे. त्यामुळे त्यांची कविता धर्म व जातीव्यवस्थेला प्रखरपणे विरोध करतांना दिसते.समाज व्यवस्थेतील दीनदुबळ्यांच्या जीवनात प्रेरणेचा धगधगता पलिता होऊन वावरताना दिसते. सामाजिक विषमतेची दरी मिटविण्यासाठी त्यांची कविता अभिमन्यू, अगस्ती,परशुराम,कर्णासारखा विद्रोह करू पाहते. त्याचबरोबर बुध्दाची करुणा सांभाळण्याचे काम त्यांची कविता करताना दिसते. आज माणूस जागोजागी गुलामित जगतो आहे, वाकतो आहे, झुकतो आहे. अशा माणसांना त्यांची कविता पाठीचा कणखर कणा देऊन आधार,धीर,देण्याचे काम करताना दिसते.
देशासाठी,राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी, विकासासाठी आयुष्य समर्पित केलेल्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करून सामाजिक समता,बंधुता या राष्ट्रीय मुल्यांची पायमल्ली होताना पाहून त्यांची कविता अंगार ओकताना दिसते.त्याचप्रमाणे त्यांची कविता मंदिर,मस्जिद,गुरुद्वारा आणि चर्चची भाषा करून एकात्मतेचे बीज रुजविण्याचा प्रयत्न करताना दिसते.त्यांची कविता जशी प्रेमावर भाष्य करते, तद्वतच ती निसर्गाचे विविध विभ्रम टिपताना दिसते.आभाळ,पाऊस,वारा,गंध,पशु,पक्षी,चांदणं या निसर्ग प्रतिमांमधून हिरव्या श्रावणाची चित्रकारासारखी शब्दातून सुंदर कलाकृती चितारतांना दिसते. त्यामुळे श्रावणासारखी त्यांची कविता वाचकांच्या मनाला हिरवंगार करून जाते.कवी प्रा.चौधरी यांच्या कवितेत आईबद्दलची महती वाचकांना प्रकर्षाने जाणवत राहते.आईचे अस्तित्व आणि ती गेल्यानंतरची भयावकता कवी मनाला त्रस्त करते. त्या त्रस्ततेतून आईचं मोठेपण, तिचं महात्म्य, तिच्या अस्तित्वाच्या खुणा हा त्यांच्या कवितेचा विषय होतो. राष्ट्रीय एकात्मता निर्मितीसाठी तसेच एकसंघ भारत, निधर्मी भारत बनवण्यासाठी भ्रष्टाचार, जातीय कलह, धर्मांधता नष्ट करण्याची भाषा त्यांची कविता करते. राष्ट्रीय मुल्यांची होणारी प्रतरणा पाहून कवी मन हळवं होत जातं. एकीकडे स्त्रीला देवत्व बहाल केले जाते तर दुसरीकडे जन्मापूर्वी तिला गर्भातच मारलं जातं. हा मानवी जीवनातला विरोधाभास त्यांची कविता आधोरेखित करताना दिसते.त्याचबरोबर त्यांची कविता लिंगभेदावर तितक्याच प्रखरतेने तुटून पडताना दिसते.प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाचे,विचारांचे,संघर्षाचे आणि क्रांतीचे गुणगान गात त्यांच्या कार्याचा गौरव त्यांची किता करताना दिसते.बाबासाहेबांचे सार्वजनिक जीवनातील कर्तृत्व त्यांची कविता अधोरेखित करून जाते. तर कधी माणसांच्या वृद्धापकाळातील संध्याकाळच्या उदासीचे भावतरंग चितारताना त्यांची कविता वाचक मनाला घायाळ करताना दिसते. एखादा बंद, हरताळ हा सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर किती मोठा परिणाम करून जातो. त्या विदारकतेचा बोध त्यांची करून देते.तशीच शेती आणि शेतकरी यांचे जीवन, नेत्यांचा भ्रष्टाचार, गरिबांची लूट यावर आगपाखड करताना त्यांची कविता दिसते.एकीकडे देश महान म्हणत देश गहाण टाकण्याची वेळ आणणाऱ्या नेत्यांच्या मानसिकतेवर घणाघात करते. आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या दारी मदतीची वाऱ्यामागून वरात कशी येते. यावर त्यांची कविता उपहासात्मक शब्दातून शासनव्यवस्थेची खिल्ली उडवीत भाष्य करते.
कवी चौधरी यांची कविता ग्रामीण जीवनातील रितीरिवाज, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि एकमेकांबद्दची आस्था,आपलेपणा आज संपत चालल्याची खंत मांडताना दिसते. जागतिकीकरणाचा फटका गाव खेड्यांना कसा बसतो. याची जाणीव त्यांची कविता प्रकर्षाने करून देते. तसेच दंगल आणि दंगली नंतरचे होणारे परिणाम मांडताना त्यांची कविता दिसते. तशीच त्यांची कविता कधी शेत शिवारातले हिरवेपण टिपते, तर कधी हळव्या श्रावणाचे नयनरम्य दृश्य रेखाटताना दिसते. तर कधीकधी खेड्यांच्या उध्वस्तपणाच्या जाणीवा तितक्याच ताकदीने टिपताना दिसते. एकूणच त्यांची कविता ही समाजमनाचं वास्तव चित्र रेखाटण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करते. मनाची प्रामाणिकता हे त्यांच्या कवितेचं सूत्र असल्याने त्यांच्या कवितेत वैविध्यता येते. त्यामुळे कवितेची सरमिसळ झाल्याने वाचकांना ती एकसुरीपणाची वाटत नाही. त्यातून कवितेचा आनंद वाचकांना अधिक मिळत राहतो. ग्रामीण जीवनातील प्रतिमा आणि प्रतीकं मुबलक प्रमाणात त्यांच्या कवितेत दिसतात.त्यामुळे त्यांची कविता वाचकांना आपली वाटते. चौधरी यांच्या कवितेत समाजजीवनाचे वास्तव चित्र तसेच आभाळ, पाणी, पाऊस या प्रतिमामधून निसर्गाचे लोभसवाणे दृश्य चितारले आहे. त्याचप्रमाणे स्त्री-पुरुष समानतेतील विसंगती दाखविताना झिंगलेल्या पुरुषी अहंकाराचे चित्र त्यांची कविता रेखाटून जाते. स्वप्ने विकत घेऊन जीवनाच्या वाटेवरचा अंधार कधीच नष्ट नाही. अशी वेदनाही कविता व्यक्त करते. सर्वसामान्य माणसाला दुःखातून मुक्त करण्याचा त्यांची कविता प्रयत्न करते. तशीच सगळ्याच दुःखाच्या व्यथा-वेदनेतून बंधमुक्त करण्याची भाषा त्यांची कविता दिसते. तर कधी अंधार युगात प्रकाश पोहोचविण्याचा उद्घोष करतानाही त्यांची कविता दिसते. कवी बी.एन.चौधरी त्यांची कविता चिंतनाच्या विविध परिणामांसह विचारसूत्राचे काव्यात्मक दर्शन वाचकांना नक्कीच घडवत राहते. हे विसरून चालणार नाही.
कवी प्रा.बी.एन.चौधरी हे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील पी.आर.हायस्कूलमधून नुकतेच वर्षापूर्वी प्राचार्य पदावरून निवृत्त झाले.धरणगाव हे कविवर्य बालकवींचं जन्मगाव.कवी प्रा.बी.एन.चौधरी हे विज्ञान विषयाचे शिक्षक असूनही त्यांनी एम.एस्सी.बी.एड,नंतर मराठी विषयातून एम.ए.पदवी प्राप्त केली.शालेय सेवेत त्यांनी गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन केले.त्यांची ओळख लेखक, कवी, गझलकार, समीक्षक , पत्रकार आणि व्यंगचित्रकार म्हणून आहे. त्यांचे आजपर्यंत ‘ ह्याला जीवन ऐसे नाव’, ‘माय आंबा’, हे दोन ई-बुक-कथासंग्रह प्रकाशित आहेत.याचप्रमाणे ‘बंधनमुक्त’ हा काव्यसंग्रह तर ‘ उध्वस्त ’ हा कथासंग्रह व एक समीक्षाग्रंथ प्रकाशित आहेत.त्याचबरोबर म.रा.शै.सं.प्र.संस्था, पुणे यांच्या ‘लोकसंख्या शिक्षण हस्त पुस्तिका’निर्मितीत त्यांनी संपादन सहाय्य केले आहेत.त्यांना आजपर्यंत मार्मिक व्यंगचित्रकार राज्य पुरस्कार, म.सा.प.चा बहिणाबाई काव्य पुरस्कार,काव्य दिंडी राज्य पुरस्कार,काव्य साधना राज्य पुरस्कार,विभावना राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, मालन राज्यस्तरीय कथा पुरस्कार,लोकसंख्या शिक्षण राज्य पुरस्कार,यशवंत युवा गौरव राज्य पुरस्कार,आचार्य अत्रे व्यंगचित्रकार पुरस्कार,जि.प.आदर्श शिक्षक पूरस्कार, दादोजी कोंडदेव राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकमत दिवाळी अंक काव्य पुरस्कार, खानदेश रत्न पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार,साने गुरुजी पुरस्कार,लोकमत दिवाळी अंक काव्य पुरस्कार,दर्पण सदर लेखन पुरस्कार,तापी-पुर्णा काव्य पुरस्कार,सप्तर्षी कथा पुरस्कार,गोंदण कथा पुरस्कार, साहित्य कर्नल सन्मान, कुबेर पुरस्कार, तसेच एक तोळे सोन्याचा सुवर्णयोग राज्य पुरस्कार मिळालेला आहे.
कवी प्रा. बी.एन. चौधरी यांनी आजपर्यंत महाराष्ट्रात शंभरच्यावर ठिकाणी ‘ लोकसंख्या-शिक्षण-विस्फोट ’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे तीस जिल्ह्यात प्रदर्शन भरविण्यात आले. विविध वर्तमानपत्रातून त्यांचे ‘चिमटे’, ‘शाब्बास पठ्ठे ’, ‘अहो ऐकलंत कां ?’, ‘ तिरंदाज’, ‘भेळ-पुरी’ या त्यांच्या व्यंगचित्र मालिका प्रकाशित झाल्या आहेत.प्रा. चौधरी यांनी काही वर्षे महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून जळगाव जिल्ह्यात काम पाहिले आहेत. तसेच त्यांनी धरणगाव येथील नगरपालिकेच्या झुमकराम सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहेत. धरणगाव साहित्य कला मंचचे ते अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. धरणगावच्या स्व. जिभाऊ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भडगावच्या बहिणाई प्रतिष्ठानचे सचिव पदावर कार्यरत आहेत. अशा सर्व क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन काम करणाऱ्या कवी प्रा. बी.एन. चौधरी यांच्या आवाजात त्यांच्या काही कविता ऐकू या.
प्रा.लक्ष्मण महाडिक
९४२२७५७५२३