मुंबई – प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सर्वांना सहभागी होण्याची इच्छा असते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांना जवळून पाहण्याचा आणि त्यांना भेटण्याचा योग येतोच. शिवाय पैसे जिंकण्याची संधी असते. त्यामुळे हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय झाला आहे. पण या कार्यक्रमात सहभाग घेणे रेल्वे कर्मचा-याला चांगलेच महागात पडले आहे. रेल्वे कर्मचारी देशबंधू पांडे यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. कार्यक्रमातून देशबंधू यांनी एकूण ३,२०,००० रुपये जिंकले. परंतु त्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली. रेल्वे विभागाकडून त्यांना नोटीस (आरोपपत्र) पाठवून त्यांची पदोन्नती थांबविण्यात आली आहे.
पूर्ण प्रकरण काय आहे
कोटा रेल्वे मंडळाचे स्थानिक खरेदी विभागाच्या कार्यालयातील अधीक्षक देशबंधू पांडे यांनी नुकताच केबीसीमध्ये सगभाग घेतला होता. त्यासाठी ते ९ ते १३ ऑगस्टपर्यंत मुंबईत थांबले होते. आपल्या रजेसाठी त्यांनी अधिकार्यांना सूचना केली होती. परंतु त्यांच्या रजेच्या अर्जावर विचारच झाला नव्हता, असे सांगितले जात आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, देशबंधू यांना रेल्वे विभागाकडून आरोपपत्र पाठविण्यात आले असून, त्यांची पदोन्नती थांबविण्यात आली आहे.
देशबंधू जिंकले ३,२०,०००
देशबंधू पांडे यांचा शो २६ आणि २७ ऑगस्टला प्रसारित झाला होता. शोमध्ये ६,४०,००० रुपयांच्या अकराव्या प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकले नव्हते. त्यानंतर त्यांना ३,२०,००० रुपयांवर समाधान मानावे लागले होते. ते उत्तर देऊ न शकलेला प्रश्ना असा होता, “यापैकी कोणता देश पूर्णपणे युरोपमध्ये येतो?” या प्रश्नाच्या उत्तराचे पर्याय होते – रशिया, तुर्की, युक्रेन, कझाकिस्तान.
बरोबर उत्तर कोणते
देशबंधू यांच्याकडे प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचे मत (एक्सपर्ट की राय) ही लाइफलाइन उपलब्ध होती. ते तिचा वापर करू शकले असते. परंतु त्यांनी लाइफलाइनचा वापर न करता प्रश्नाचे चुकीचे (रशिया) उत्तर दिले. युक्रेन हे प्रश्नाचे योग्य उत्तर होते.